अहमदाबाद - भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगंबरांवरील विधानाविरोधात काल देशभरात मुस्लिम बांधवांनी तीव्र आंदोलन केले होते. दरम्यान, या आंदोनानंतर आज नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ अहमदाबादमधील सरखेज गांधीनगर महामार्गावर शेकडो लोकांनी जमा झाले. त्यांनी नुपूर शर्मा आणि हिंदू ऐक्यासाठी एक मोर्चा काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना रोखले. यावेळी आंदोलकांनी सनातन सेवा संस्थानच्या लेटर पॅडवर एक पत्र देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही पोलिसांनी नकार दिला. तसेच काही लोकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना सोडून दिले.
गुजरातमधील अहमदाबाद आणि बडोद्यामध्ये शुक्रवारी मुस्लिम बांधवांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत आंदोलन केलं होतं. तसेच विरोध म्हणून दरियापूर आणि करांज परिसरात दुकानं बंद ठेवण्यात आली होती. यावेळी आंदोलकांनी हातात काही फलकही घेतले होते. त्यात नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी केली होती.
या आंदोलकांपैकी माजी नगरसेवक हसन खान पटाण यांनी नुपूर शर्माच्या विधानांमुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला. मात्र सरकारने तिच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. आज बंदचं आवाहन करण्यात आलं नव्हतं. तरीही लोक स्वेच्छेने आंदोलन करण्यासाठी उतरले.
दरम्यान, बडोद्यामध्येही नुपूर शर्मांनी केलेल्या विधानाविरोधात आंदोलन झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जुन्या शहरातील बहुतांश भागामध्ये दुकाने सुरू राहिली. तसेच कालुपूर आणि अन्या भागात शुक्रवारी जनजीवन सर्वसाधारण दिवसांप्रमाणे होते.