नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सोमवारी रात्री विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्या घराला विद्यार्थ्यांनी घेराव घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी घराची तोडफोड आणि पत्नीला घरात कैद केल्याचा आरोप कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी केला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएनयूत विद्यार्थ्यांनी कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्या घरापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, सोमवारी रात्री विद्यार्थ्यांनी कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्या घरापर्यंत मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबविले. आतापर्यंत अनेक विद्यार्थी मोर्चातून आपल्या वस्तीगृहात परतले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी ट्विटरवरून सांगितले की, 'विद्यार्थ्यांनी जबरदस्तीने माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घराची तोडफोड केली. तसेच, माझ्या पत्नीला घरात कैद करुन ठेवले. मी एका मिटिंगमध्ये असताना होतो. अशा प्रकारे आंदोलन करण्याचा मार्ग आहे का? घरातील एकटी असलेल्या महिलेला घाबरविणे?'
दरम्यान, याप्रकरणी विद्यार्थी संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे. आंदोलनाला हिंसक म्हणून विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विद्यार्थी फक्त कुलगुरू एम. जगदीश कुमार यांची भेट घेऊन काही प्रश्न विचारणार होते. मात्र, त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. विद्यार्थी गेल्या सात दिवसांपासून आंदोलन करत आहेत. याप्रकरणी विद्यार्थी कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना भेटायला गेले. परंतू ते भेटले नाहीत, असे विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे.