कोलकाता/भुवनेश्वर : बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात तयार झालेले चक्रीवादळ ‘असानी’ उत्तर आंध्र प्रदेश-ओडिशाच्या दिशेने सरकल्याने रविवारी सायंकाळी चक्रीवादळ आणखीनच तीव्र झाले आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे हवामान विभागाने सांगितले.
चक्रीवादळ असानी वायव्येकडे सरकले असून, पुढच्या चोवीस तासांत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात त्याचे रूपांतर एका भीषण चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ १० मेपर्यंत वायव्येकडे आणि बंगाल उपसागराच्या वायव्य भागालगतच्या उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर अग्रेसर होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर हे चक्रीवादळ वायव्येकडून बंगाल उपसागराच्या वायव्येकडे ओडिशा किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांन शनिवारी म्हटले होते की, चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता नाही; परंतु पूर्व किनारपट्टीच्या समांतर सरकण्याची आणि मंगळवारी सायंकाळपासून पाऊस होण्याची शक्यता आहे.हवामान विभागानुसार चक्रीवादळ किनारपट्टीवर न धडकताच पुढील आठवड्यापर्यंत कमजोर होण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशातील किनारपट्टीवर मंगळवारपासून जोरदार वारे वाहण्याची आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिशाचे विशेष मदत आयुक्त पी. के. जेना यांनी सांगितले की, राज्य सरकारने बचाव मोहिमेसाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. पुरीनजीकच्या किनारपट्टीपासून १०० किलो मीटर दुरूनच हे वादळ जाणार असल्याने राज्यासाठी हे चक्रीवादळ मोठे धोकादायक नसेल. तथापि, एनडीआरएफ ओडीआरएफ आणि अग्निशमन सेवेचे पथके कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
मंगळवारी गजपती, गंजम आणि पुरी या जिल्ह्यातील भागात पाऊस होऊ शकतो. बुधवारी गंजम, खुरदा, पुरी, जगतसिंहपूर आणि कटकमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. मंगळवार ते शुक्रवारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. कोलकाताचे महापौर फिऱ्हाद हकीम यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.