काकीनाडा (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एका समुद्र किनाऱ्यावर असलेल्या उप्पदा गावात एक अजब प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या निवार चक्रिवादळानंतर येथील गावातील लोकांचे नशीबच पालटले आहे. शुक्रवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर जेव्हा येथील लोक समुद्र किनाऱ्यावर गेले तेव्हा त्यांना तिथे छोट्या मोत्याच्या आकाराएवढे सोन्याचे तुकडे मिळू लागले.समुद्र किनाऱ्यावरील वाळूत सोन्याचे कण मिळू लागल्यानंतर स्थानिक मच्छिमारांच्या आनंदाला पारावार उरला नाही. समुद्र किनाऱ्यावर सोने मिळत असल्याची गोष्ट सगळीकडे पसरली. बघता बघता सोने गोळा करण्यासाठी किनाऱ्यावर लोकांची गर्दी झाली.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे ५० लोकांना समुद्र किनाऱ्यावर सुमारे तीन हजार ५०० रुपयांचे सोने मिळाले. यादरम्यान, अनेकजण सोने मिळेल या अपेक्षेने किनाऱ्यावरील वाळू चाळून पाहत होते. मात्र उप्पदा गावातील समुद्र किनाऱ्यांवर सोन्याचे तुकडे मिळण्याचे काय कारण आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र स्थानिक पोलिसांनी सांगितले की, समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यावरील काही मंदिरे तुटण्याची घटना घडली होती. तसेच लाटांमुळे काही घरेसुद्धा कोसळली होती. गेल्या दोन दशकांत सुमारे १५० एकर जमीन समुद्रात गेली आहे.दरम्यान, किनाऱ्यावर सापडलेल्या सोन्याची दखल महसूल विभागाने घेतली आहे. तसेच आज महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावाचा दौरा केला. एएएसआय लवू राजू यांनी सांगितले की, समुद्र किनाऱ्यावर केवळ काही मोजक्या लोकांनाच सोने मिळाले. येथे सोन्याच्या शोधात आलेला प्रत्येकजण काही भाग्यवान नव्हता.
चक्रिवादळ आले आणि मच्छिमारांचे नशीबच पालटले, किनाऱ्यावर सोने मिळू लागले
By बाळकृष्ण परब | Published: November 28, 2020 3:31 PM