श्रीनगर : पाकिस्तानी झेंडा फडकविणे हा काही गुन्हा नाही,असा दावा जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी संघटना हुरियत कॉन्फरन्सने केला आहे. आणि या घटनेवरून कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे वक्तव्य नैराश्यपूर्ण असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.हुरियतचे प्रवक्ते अयाज अकबर यांनी रविवारी केलेल्या एका वक्तव्यात असे सांगितले की, १९८३ साली जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशानुसार पाकिस्तानी झेंडा फडकविण्याचे कृत्य कुठल्याही फौजदारी गुन्ह्याच्या श्रेणीत मोडत नाही. एखाद्या देशाचा झेंडा फडकविणे म्हणजे आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारले असे मानता येणार नाही. आम्ही केवळ आपल्या संघटनेचा झेंडा फडकवीत असतो. परंतु काही अतिउत्साही युवक पाकिस्तानचाही झेंडा फडकवितात आणि यात काही नवीन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान आणि हुरियत कॉन्फरन्सच्या झेंड्यात अर्धा चंद्र आणि तारे एकसारखे असून हा केवळ एक योगायोग आहे. कारण हे चिन्ह इस्लामशी संबंधित आहेत,असाही युक्तिवाद अकबर यांनी केला. कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, हुरियत नेते गिलानी यांच्याविरुद्ध कारवाईचे सईद यांचे वक्तव्य नैराश्यपूर्ण आहे. यात काहीही नवीन नाही याची त्यांना संपूर्ण कल्पना आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघ मॅच जिंकतो तेव्हा तर झेंडे फडकविण्यासोबत फटाकेही फोडले जातात. (वृत्तसंस्था)
हुरियत म्हणते, पाकचा झेंडा फडकविणे गुन्हा नव्हे
By admin | Published: May 04, 2015 12:39 AM