श्रीनगर - राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून (एनआयए) श्रीनगरमधील 7 ठिकाणी शोध मोहिम राबविण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना या ठिकाणांहून निधी पुरविण्यात येत असल्याची माहिती एनआयएकडे होती. एनआयएने धाड टाकलेल्यां ठिकाणांमध्ये फुटीरतावादी नेते यासीन मलिक, शब्बीर शहा, मीरवेझ उमर फारूक, मोहम्मद अशरफ खान, मसरत आलम, झफार अकबर भट आणि नसील गिलानी यांचा समावेस आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआरपीएफ जवानांच्या सहाय्याने एनआयएने ही धडक कारवाई केली आहे. गुन्हेगारी जगताशी संबंधित बरचंही सामान आणि माहितीही यावेळी तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. त्यामध्ये संपत्ती, पैशांच्या देवाण-घेवाणीची कागदोपत्रे आणि बँक अकाऊंटचे डिटेल्सही एनआयएच्या हाती लागले आहेत. त्यासोबतच, इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामुग्रीही तपास यंत्रणांची जप्त केली आहे. त्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, पेन ड्राईव्ह, ई-टॅब्लेट, डीव्हीआर आणि संवादाची इतरही आधुनिक साधने आहेत. त्यामुळे या फुटीरतावाद्यांचे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांशी हॉटलाईनद्वारे असलेलं कनेक्शन तोडण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. .
टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, तपास यंत्रणांनी या छापेमारीत विविध दहशवादी संघटनांचे लेटरपॅड, पाकिस्तानचा व्हीसा मिळवून देण्यासाठी केलेली शिफारस, पाकिस्तान एज्युकेशनल इंस्टीट्यूटसंदर्भातील माहितीही जप्त केली आहे. तसेच हुर्रियतचा प्रमुख मिरवेझ उमर फारूक यांचे पाकिस्तानशी असलेले हॉटलाईन कनेक्शनही नेस्तनाबूत करण्यात आले आहे. फारूकडे पाकिस्तानशी संपर्क साधण्यासाठी विशेष इंटरनेट सुविधा होती, असे एनआयएकडू सांगण्यात आले आहे. श्रीनगरमधील नियमांचे उल्लंघन करता, तब्बल 40 फूट खोल अँटींना बसवून हे कम्युनिकेशन करण्यात येत होते, असाही दावा एनआयएकडून करण्यात आला आहे.