ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटीवरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. अक्षम आणि संवेदनाहीन सरकारकडून वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात येत आहे. काँग्रेस सुरुवातीपासूनच जीएसटीच्या समर्थनात आहे, पण नोटाबंदीप्रमाणेच जीएसटीचीसुद्धा अत्यंत घाई गडबडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीवरून आक्रमक झालेल्या काँग्रेसने संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या जीएसटीच्या उदघाटन समारंभावर याआधीच बहिष्कार घातला आहे.
राहुल गांधी म्हणाले, "जीएसटी ही भरपूर फायदा मिळवून देणारी सुधारणा आहे. पण ही करप्रणाली कोणतीही पूर्वतयारी न करता लागू करण्यात येत आहे. हे योग्य नाही. सरकार जीएसटीचा उपयोग जनतेच्या फायद्यासाठी कमी आणि स्वत:चा प्रचार करण्यासाठी करत आहे." भारतात जीएसटीची अंमलबजावणी अशाप्रकारे करण्याची गरज आहे जेणेकरून, देशातील कोट्यवधी नागरिक, छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना अडचणी येणार नाहीत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.