कोलकातामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेचा पती तिला रुग्णालयात सोडून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर दोन वर्षांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत बिल जवळपास १ कोटी रुपये झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेला पॅरेलासिस झालं आहे आणि तिला बोलताही येत नाही.
डोक्याला दुखापत झाल्यानंतर २०२१ मध्ये महिलेला अपोलो मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार करताना अनेक मोठ्या सर्जरी कराव्या लागल्या. ज्यामध्ये न्यूरो-सर्जरीचाही समावेश होता. सर्जरीनंतर महिलेची प्रकृती स्थिर आहे परंतु ती बोलू शकत नाही. श्वासोच्छवासासाठी ट्रॅकियोस्टोमी करण्यात आली आहे.
महिलेवर रुग्णालयात दोन वर्षे उपचार सुरू आहेत. पण आता रुग्णालयाचं म्हणणं आहे की, तिचं १ कोटी रुपयांचं बिल झालं आहे. महिलेकडे विमा पॉलिसी आहे, परंतु ती फक्त सहा लाख रुपयांपर्यंत आहे, जी उपचाराच्या सुरुवातीच्या काळात खर्च झाली होती. रुग्णालय आता जबाबदारी घेऊ शकत नाहीत, म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
महिलेच्या पतीला न्यायालयात हजर करण्यात आलं. जिथे त्याने सांगितलं की, त्याच्याकडे त्याच्या पत्नीची काळजी घेण्यासाठी पैसे नाहीत. तसेच त्याने दुसरं लग्न केल्याचं देखील म्हटलं आहे. न्यायालयाने महिलेच्या पतीला पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेशही दिले. या महिलेची कुटुंबासारखी काळजी घेणाऱ्या आमच्या नर्सना सलाम असं रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.