हैदराबाद, दि. 19- एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून पतीने पत्नीला जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. या मुलीचं नाव हरिका असल्याचं समजतं आहे. एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून हरिकाचा पती ऋषी कुमार यांने तिची जाळून हत्या केल्याचा आरोप हरिकाच्या कुटुंबियांनी केला आहे. 25 वर्षीय तरूणी हरिकाला वैद्यकिय शिक्षण घ्यायचं होतं. हरिकाचा पती सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. या प्रकरणी हरिकाच्या पती आणि त्याच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.
हरिकाने आत्महत्या केल्याचा दावा तिचा पती ऋषी कुमार याने केला आहे. पण घटनास्थळाची पाहणी केल्यावर ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना येतो आहे. हरिकाच्या पतीने तिची हत्या केली असावी, असा संशय असल्याचं पोलिसांनी म्हंटलं आहे. पण हरिकासोबत नेमकं काय घडलं हे पोस्टमार्टेमनंतर समोर येईल, असंही पोलिसांनी सांगितलं. हरिकाचा पती ऋषी कुमारने हरिकाच्या आईला रविवारी रात्री घरी बोलावून हरिकाने स्वतःला जाळून घेतल्याचं सांगितलं, अशी माहिती पोलिसांकडून मिळते आहे. हैदराबादच्या एलबी नगरमधील रॉक टाऊन कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे.
हरिका गेल्या काही काळापासून वैद्यकीय प्रवेश परीक्षा देण्याच्या प्रयत्नात होती. पण ती परीक्षा पास होत नव्हती. यावर्षीही ती परीक्षेत पास होऊ शकली नाही. हरिकाची एका खासगी कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी कोर्ससाठी प्रवेश मिळत होता. पण तिच्या पतीला ते मान्य नव्हतं म्हणून तो तिला घटस्फोटाची धमकी देत होता, असा आरोप हरिकाच्या आई-वडिलांनी केला आहे. ह
रिका आणि ऋषीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तेव्हापासून एमबीबीएसमध्ये जागा मिळत नाही म्हणून हरिकाला पतीकडून त्रास दिला जात होता. तसंच तिला हुंड्यासाठीही त्रास दिला जात होता. ही एक नियोजीत हत्या असल्याचं हरिकाच्या आई व बहिणीने म्हंटलं आहे. 'हरिकाचा आधी गळा दाबण्यात आला नंतर तिला जाळण्यात आलं का ? या गोष्टी शवविच्छेदनानंतर स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.