नवी दिल्ली: गाझियाबादमधील कृष्णा सोसायटी पाच जणांच्या मृत्यूमुळे हादरली. पती-पत्नीने आपल्या दोन किशोरवयीन मुलांना विष देऊन स्वत: आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. व्यावसायिक भागीदार असलेल्या महिलेनेदेखील त्यांच्यासमवेत आत्महत्या केल्याने पोलीस चक्रावले आहेत. गुलशन (४५) त्यांची पत्नी परवीन (४३) व संजना (३८) यांनी मंगळवारी पहाटे कृष्णा सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. घरातच गुलशन व त्याच्या पत्नीने सोमवारी मध्यरात्री मुलगा ऋत्विक (१७) व मुलगी ऋत्विका (१८) यांना विषाचे इंजेक्शन दिले. पहाटे दोघांनी संजनासमवेत आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस आयुक्त मनीष मिश्रा यांनी दिली. संजना गुलशनची व्यावसायिक भागिदार होती. एकाचवेळी पाचही जणांचे मृतदेह आवारात ठेवल्याने संपूर्ण सोसायटीतीली लोक सुन्न झाले.
गुलशन यांनी घरी ससा पाळला होता. ससाही मृतावस्थेत आढळला. सशाचा मृत्यूदेखील विषामुळेच झाल्याचा दावा पोलिसांनी केला. संजना गुलशनची व्यावसायिक भागीदार होती. व्यवसायात सतत होणा-या नुकसानामुळे पत्नीचे गुलशनशी सतत खटके उडायचे. त्यांच्यात वाद होत असत. पोलीस घराची कसून चौकशी करीत आहेत. अनेक वस्तू फॉरेंसिक विभागाला पाठवण्यात येतील. व्यावसायिक नुकसान हेच कारण सध्या समोर दिसत असले तरी पूर्ण तपास झाल्यावरच ठामपणे सांगू, अशी माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. गुलशन व परवीन यांचा जागीच अंत झाला होता तर संजना तेव्हा विव्हळत होती. पोलिसांनी तातडीने संजना यांना रुग्णालयात नेले. दोन तासांनी संजनाचाही मृत्यू झाला.
घरात पोलिसांना घरी चिठ्ठी सापडली. त्यात राकेश वर्मा यांचे नाव आहे. राकेश वर्मा परवीन यांचे मेहुणे आहेत. गुलशन यांनीच ती चिठ्ठी लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. दु:खद बाब म्हणजे भिंतीवर ५००च्या नोटा गुलशन यांनी चिकटवल्या होत्या. अंत्यविधीसाठी हे पैसे वापरावे, असा उल्लेख त्यात आहे. गुलशन यांना व्यवसायात मोठा तोटा झाला. तो भरून निघत नव्हता. दिवसेंदिवस त्यांची स्थिती खालावत होती. शालिमार गार्डनसारख्या उच्चभ्रू भागातून याच ऑक्टोबरमध्ये इंदिरापूरममध्ये राहण्यास आले होते. गुलशन यांनी लोकांना दिलेले अनेक चेक बाऊन्स झाले होते. त्यातील काही गुलशन यांनी भिंतीवर चिकटवले. महत्त्वाची बाब म्हणजे राकेश शर्मा यांना केस बाऊन्सप्रकरणी तुरुंगवासही झाला आहे. गुलशनला वडिलांच्या संपत्तीतून दोन कोटी रुपये मिळाले. हे सर्व पैसे गुलशन यांनी राकेश वर्मांसमवेत व्यवसायात गुंतवले. व्यवसायात मोठा तोटा झाला. मुद्दलही गेली, उलट व्याज वाढले. लोकांची देणी वाढली. गुलशन कुमार यांनी परतफेडीसाठी चेक दिले होते. ते वारंवार बाउन्स होऊ लागले. गुलशन यांच्या घरी सापडलेले बाऊन्स चेक तब्बल एक कोटी रुपयांचे आहेत.