मध्य प्रदेशात सीधी येथे बसचा भीषण अपघात घडला, जे विसरणं कोणालाही शक्य नाही. आतापर्यंत या दुर्घटनेत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांचा विवाह ८ जून २०२० मध्ये झाला होता, अखेरच्या श्वासापर्यंत एकत्र राहू असं एकमेकांना वचन दिलं होतं, अखेर या वचनाची आठवण सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणते. (Sidhi Bus Accident in Madhya Pradesh)
या दोघा पती-पत्नीवर काळाने झडप घातली आहे. सीधी जिल्ह्यातील शमी येथील गैवटाच्या देवरी गावात राहणारा २५ वर्षीय अजय पनिका, सीधीमध्ये रूम घेऊन राहत होता. २३ वर्षीय पत्नी तपस्यासाठी एएनएम पेपर देण्यासाठी ते सीधीहून सतना येथे जात होते, याचवेळी झालेल्या रस्ते अपघातात या दोघांचा जीव गेला. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळताच सगळ्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, दोघांच्या मृत्यूने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला होता.
तपस्याचा मृतदेह मंगळवारी दुपारी ३ वाजता सापडला तर अजयचा मृतदेह ५ वाजता सापडला. पोस्टमोर्टमनंतर दोघांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून रात्री १० च्या सुमारास देवरी गावात पोहचला. या दोघांच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली होती. सर्वांचे डोळे पाण्याने भरले होते, अजयचे वडील गुजरातमध्ये असल्याने त्यांना मुलगा-सुनेच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता आलं नाही. त्यांना गुजरामधून यायचं झालं असतं तरी ३ दिवसांचा कालावधी लागला असता. पोर्स्टमोर्टममुळे मृतदेह इतके दिवस ठेवणे शक्य नव्हतं.
८ महिन्यांपूर्वीच या दोघांचे लग्न झालं होतं, अजयची पत्नी तपस्याला शिक्षण देऊन तिला काहीतरी बनवण्याची इच्छा होती, त्यासाठी परीक्षेचा पेपर देण्यासाठी दोघं सतना येथे जात होते, मात्र दुर्दैवी अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर अजय आणि तपस्या दोघांचे मृतदेह सापडल्यावर एकत्र त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांना एकाच चितेवरून गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला.
अपघातातील जखमींना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत
अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर राज्य सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केली.