उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अजब प्रकरण समोर आले आहे. पत्नी राजकारणात खूपच जास्त सक्रिय असल्याने नाराज झालेल्या पतीने तिला घराबाहेर काढलं आहे. राजकारणावरून सुरु झालेला वाद टोकाला पोहोचला असून हे प्रकरण आता घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. पत्नी सकाळी घराबाहेर पडते आणि दिवसभर राजकीय कामात व्यस्त राहते, ती घराकडे लक्ष देत नाही असा आरोप पतीने केला आहे.
पत्नी एका मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे. राजकारणात व्यस्त असल्यामुळे तिला कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. हे पती-पत्नीमध्ये वादाचे ठरलं आणि हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलं आहे. पतीने आपल्या पत्नीवर आरोप केला की, ती घरी वेळत देत नाही ज्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचलं आहे.
न्यू आग्रा पोलीस स्टेशनमध्ये राहणाऱ्या या तरुणीचं सिकंदरा पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाशी लग्न झालं होतं. हा तरुण वैद्यकीय विभागात खासगी नोकरीला आहे. या दोघांचं 8 वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. त्याला एक 6 वर्षांचा मुलगाही आहे. लग्नाची काही वर्षे सर्व काही ठीक चाललं होतं. मात्र काही वर्षांनी पत्नीला अचानक राजकारणाबद्दल आवड वाटू लागली.
पतीच्या नकारानंतरही पत्नी राजकारणात सक्रिय राहिली. पत्नीने ठिकठिकाणी आपले होर्डिंग्ज लावायला सुरुवात केली. होर्डिंग्ज लावण्याच्या कल्पनेने पती आणखी नाराज झाला. सततच्या राजकारणामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. सहा महिन्यांपूर्वी पत्नी माहेरी आली आहे.
कुटुंब समुपदेशन केंद्राच्या समुपदेशकाने पती-पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पत्नीने राजकारण सोडलं तर तिला सोबत ठेवणार असल्याचं पतीने स्पष्टपणे सांगितलं. तर दुसरीकडे पत्नीने ती समाजसेवेसाठी राजकारण करते त्यामुळे राजकारण सोडू शकत नाही असं सांगितलं
यावर कुटुंब समुपदेशन केंद्राचे समुपदेशक अमित गौड म्हणाले की, एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पती-पत्नीमध्ये राजकारणावरून वाद सुरू आहेत. पत्नीने राजकारणात सक्रिय असणे पतीला आवडत नाही. पती-पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या दोघांना पुढील तारीख देण्यात आली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.