लखनौ, दि. 11 - उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका मुस्लिम महिलेने घरातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चित्र काढल्याने तिच्या नव-यानं तिला बेदम मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या वडिलांनी तसा आरोप केला आहे. बलिया जिल्ह्यातील बसारीकपूर येथील ही घटना आहे. नगमा परवीन असे या पीडित महिलेचं नाव आहे. नगमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चित्र काही दिवसांपूर्वी घराच्या भिंतीवर काढले होते. यामुळे संतापलेल्या तिच्या पतीने तिला मारहाण करत घराबाहेर काढले.
नगमाचे वडील बलिया जिल्ह्यातील मातारी गावात राहतात. या घटनेनंतर ती थेट माहेरी गेली आणि घडलेला सर्व प्रकार तिनं वडिलांना सांगितला. नगमाचे वडील समशेर खान यांनी मुलीला पतीकडून मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सिकंदरपूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नगमा परवीनचा परवेझ खान याच्यासोबत नोव्हेंबर 2016 मध्ये निकाह झाला होता.
तिने केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे चित्र घराच्या भिंतीवर काढल्याच्या रागातून हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. नगमाला सासरच्या लोकांनी तिला मानसिक रोगीदेखील ठरवल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान परवेझ दुसरे लग्न करत असल्याची माहिती मिळताच नगमा पुन्हा सासरी गेली परंतु सासरच्यांनी तिला घरात येऊ दिले नाही. यानंतर नगमा व तिचे वडील समशेर खान यांनी पोलिसात जाऊन आपली तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी बलियाच्या पोलीस अधीक्षकांनी नगमाचा पती,सासू-सास-यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. घडल्या प्रकाराची चौकशी करुनन कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.