इंदौर: मध्यप्रदेशमध्ये लहान मुलगी रात्री उशिरापर्यत रडत असल्यामुळे झोपमोड झाल्याने एका पतीने त्याच्या पत्नीला तलाक देऊन घराच्या बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकाराची पीडित महिलेने पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी तक्रार नोंदविली आहे.
पीडित महिला उज्मा अन्सारी(21) पोलिसांना सांगितले की, एक वर्षाची मुलगी आजारी असल्याने ती रात्री सारखी रडत होती. त्यामुळे तिच्या पतीची(अकबर) झोपमोड झाल्याने मुलीला मारुन टाकण्याची धमकी देत माझ्याशी भांडू लागला. माझे सासरे व पतीचा भाऊ देखील दोघांचा भांडण्याचा आवाज ऐकुन खोलीत आले. मात्र त्यांनी देखील मला मारहाण करण्यास सुरुवात करुन माझ्या लहान मुलीला पलंगावरुन खाली ढकलून दिले.
त्यानंतर पतीने तीन वेळा तलाख बोलून माझ्या आईला फोन करुन मला या घरातून घेऊन जाण्यास सांगितले आणि माझ्यासह मुलीला देखील घराबाहेर काढण्यात आले. याआधी देखील पीडित महिलेला तिचा पती व त्याच्या घरातील लोकांनी हुंडा देण्यावरुन आणि मुलगी झाल्यामुळे मारहाण करयाचे असा देखील आरोप केले आहे.
मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) विधेयक 2019 च्या माध्यमातून तिहेरी तलाक बोलुन संबंध संपवण्याच्या या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली. त्यानंतर हे विधेयक मंजुर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मान्यतेने कायद्यात रूपांतरित झाले. या कायद्यात गुन्हेगाराला तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होणार आहे.