रामपूर- ट्रिपल तलाकची प्रथा कायमची बंद करण्यासाठी संसदेत गुरूवारी विधेयक मांडलं जाणार आहे. एकीकडे केंद्र सरकारकडून ट्रिपल तलाकची प्रथा कायमची बंद करण्यासाठी कठोर विधेयक आणण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे ट्रिपल तलाकच्या घटना अजूनही घडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ट्रिपल तलाक दिल्याची नवी घटना समोर आली आहे. सकाळी उशिरा उठली म्हणून एका व्यक्तीने पत्नीला मारहाण करून तिला तलाक दिला आहे. इतकंच नाही, तर पत्नीला घराबाहेर काढून घराला कुलूप लावून तो व्यक्ती निघून गेला. अजीमनगर क्षेत्रातील नगलिया आकिल गावात ही घटना घडली आहे.
गुलअफशा असं या प्रकरणातील पीडित महिलेचं नाव आहे. 'सकाळी उशिरा उठली इतकाच माझा गुन्हा झाला. त्यावरून पतीने मला बेदम मारहाण केली आणि तलाक दिला', असं गुलअफशा यांनी सांगितलं. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस पीडित महिलेला घेऊन तिच्या घरी गेले व दरवाज्याचं कुलूप तोडून घरात गेले.
गुलअफशाचं सहा महिन्यापूर्वी गावातील कासिमशी प्रेमविवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसात दोघांमध्ये खटके उडायला लागले. कासिम विनाकारण गुलअफशाला मारहाण करायला लागला. सोमवारी सकाळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर कासिमने गुरअफशाला मारहाण केली. शेजाऱ्यांनी मध्यस्ती करत दोघांमधील वाद शांत केला. मारहाण झाल्याने गुलअफशाला सोमवारी रात्रभर झोप लागली नाही म्हणून मंगळवारी सकाळी तिला उठायला उशिर झाला. त्यामुळे संतापलेल्या कासिमने तिला मारहाण करून ट्रिपल तलाक दिला तसंच घरातून हाकलून दिलं.
कासिमशी प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या गुलअफशाच्या आई-वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले होते. पण ज्या व्यक्तीसाठी गुलअफशाने घर व आई-वडिलांना सोडलं त्याचं व्यक्तीने तिला घराबाहेर काढलं आहे.