अमेठी: उत्तर प्रदेशातीलअमेठी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर इथे एका व्यक्तीला कोणताही गुन्हा न करता तुरुंगवास भोगावा लागला. ज्या पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला तुरुंगात राहावे लागले, ती पत्नी तब्बल 12 वर्षांनंतर अचानक जिवंत सापडल्याने खळबळ उडाली आहे. रायबरेली जिल्ह्यात पतीला पत्नी सापडली आहे. त्यामुळे आता त्याचे कुटुंबीय याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी करत आहेत.
ही संपूर्ण घटना अमेठी जिल्ह्यातील जैस पोलीस ठाण्याच्या अली नगर भागातील आहे. जिथे मनोज कुमार वर्मा त्याची पत्नी सीमा वर्मासोबत राहत होता. 25 मार्च 2011 रोजी मनोजची पत्नी सीमा वर्मा अचानक गायब झाली. खूप शोध घेऊनही पत्नी सापडली नाही. मग मनोजच्या सासरच्यांनी सीमा वर्माचा पती मनोज वर्माविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर स्वत:च्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवल्याचा आरोप केला. त्यानंतर मनोजला 11 दिवस तुरुंगवास भोगावा लागला.
असा झाला खुलासा तुरूंगातून जामिनावर सुटल्यानंतर मनोज हा त्याच्या पत्नीचा शोध घेत होता. यासोबतच या प्रकरणाबाबत तो न्यायालयाच्या चकरा मारत होता. त्याचवेळी 11 वर्षांनंतर मनोजला त्याची पत्नी जिवंत असल्याची माहिती मिळाली. तसेच त्याची पत्नी 3 मुलांसोबत आपल्या प्रियकरासोबत राहत असल्याची मनोजला प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर मनोजने रायबरेली जिल्ह्यातील भडोखर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अन्य कायदेशीर कारवाई केली.
पीडित पती मनोजने सांगितले की, त्याची पत्नी सीमा रायबरेलीची रहिवासी आहे, 12 वर्षांपूर्वी तिने एका व्यक्तीसोबत पळून जाऊन विवाह केला होता. हे माहीत असतानाही त्यांच्या कुटुंबीयांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मला तुरुंगवास भोगावा लागला. 12 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यामुळे आमचा उदरनिर्वाह हिरावला गेला आहे. आम्हाला निर्दोष सिद्ध करता यावे यासाठी पत्नीचे म्हणणे न्यायालयात व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हपत्नी जिवंत मिळाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पत्नीच्या माहेरच्यांनी केलेले आरोप देखील खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या आरोपामुळे पीडित तरूणाला 11 दिवस तुरुंगवास भोगण्याव्यतिरिक्त न्यायासाठी 12 वर्षे न्यायालयात चकरा माराव्या लागल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"