महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या शालिनी संघलने खूप स्वप्न पाहिली होती. पण तिला आता सासरच्या घरी राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी शालिनी आणि प्रणव यांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं आणि नंतर दोघेही हनिमूनसाठी बालीला रवाना झाले, परंतु तेथे सुंदर क्षण घालवण्याचं तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं. शालिनीचा दावा आहे की, तिथे पोहोचताच नवऱ्याने बोलणं बंद केलं आणि नंतर ५० लाखांची मागणी केली.
शालिनी तिथून कशी तरी घरी परतली पण घरीही तीच परिस्थिती होती. होळीच्या दिवशी तिला जबरदस्तीने तिच्या पालकांच्या घरी पाठवण्यात आलं आणि तिथून परत बोलावण्यात आलं नाही. ती स्वतःहून परत आली तेव्हा घराचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर शालिनी तिच्या कुटुंबीयांसह तिथे धरणे धरून बसली आहे. १२ तास झाले, पण दरवाजा उघडला नाही. शालिनी आणि तिच्या कुटुंबाने आत्महत्या करण्याची धमकीही दिली. दरवाजा उघडला नाही तर आम्ही इथेच जीव देऊ असं म्हटलं आहे.
"तुझ्या आई-वडिलांकडून ५० लाख घेऊन ये"
शालिनी म्हणते की, "माझं लग्न १२ फेब्रुवारी रोजी प्रणव सिंघलशी झालं. आम्ही दोघेही आमच्या हनिमूनसाठी बाली येथे गेलो होतो. तिथे प्रणव म्हणू लागला की, खूप पैसे खर्च झाले. लग्न आणि घर बांधण्यासाठी खूप पैसे खर्च झाले होते. आता जर तुला आमच्यासोबत राहायचं असेल तर तुझ्या आई-वडिलांकडून ५० लाख रुपये आणावे लागतील. मला वाटलं होतं की सर्व काही ठीक होईल. ५० लाख ही काही छोटी गोष्ट नाही. काही दिवसांनी सासरच्यांनी माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं."
"मला घरात येऊ दिलं नाही"
"या विषयावर अनेक वेळा चर्चा झाली आणि मला होळीच्या दिवशी माझ्या आईच्या घरी पाठवण्यात आलं आणि ती एक परंपरा आहे असं सांगितलं. आम्ही आमच्या घरी पहिली होळी साजरी करतो असं म्हणाले. त्यानंतर मला घ्यायला कोणी आलं नाही, तेव्हा मी माझे काका आणि इतरांसोबत इथे आले. तेव्हा मला घरात येऊ दिलं नाही. मला इथून हाकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनीच पोलिसांना फोन करून बोलावलं आहे."