उत्तर प्रदेशच्या पीसीएस अधिकारी ज्योती मौर्याचे प्रकरण अजून थंडावले नाही तोच झारखंडच्या साहेबगंजमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने दावा केला आहे की त्याने आपल्या पत्नीला खूप कष्टाने नर्स होण्यासाठी मदत केली. तिच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं. ते कर्ज फेडण्यासाठी मजुरी केली. आता पत्नी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी दुसऱ्या तरुणासोबत 14 एप्रिलपासून फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहेबगंजच्या बांझी बाजारमध्ये राहणाऱ्या कन्हाई पंडितचं लग्न कल्पना देवी हिच्याशी 14 वर्षांपूर्वी हिंदू रितीरिवाजांनुसार झालं होतं. कल्पना बोरियो ब्लॉक परिसरातील तेलो गावची रहिवासी आहे. पती कन्हाई पंडितच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर तिने पतीकडे अभ्यासाचा हट्ट धरायला सुरुवात केली. पत्नीच्या आग्रहानंतर त्याने मोठ्या कष्टाने जमशेदपूरच्या नर्सिंग कॉलेजमध्ये एएनएमचे शिक्षण घेण्यासाठी तिला पाठिंबा दिला. पत्नीला शिकवण्यासाठी सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचं पतीने सांगितले. त्यानंतर त्याची पत्नी साहिबगंजमधील जुमावती नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून काम करू लागली.
पती कन्हाई पंडितने सांगितले की, तो 2019 मध्ये पैसे कमवण्यासाठी गुजरातला गेला होता. तेथे तो दोन वर्षांहून अधिक काळ राहिला. त्याला कोरोनाच्या काळात घरी यायचे होते, तेव्हा पत्नी म्हणाली इथे येऊन काय करणार? तुम्ही तिथे रहात आहात हे चांगले आहे. पत्नीचे म्हणणे मान्य करून तो तिथेच राहिला. पत्नीने त्याला फक्त पैसे पाठवण्यास सांगितले. कन्हाई पंडित यांच्या म्हणण्यानुसार, तो या वर्षी होळीच्या दिवशी घरी आला तेव्हा त्याला त्याच्या पत्नीचे वागणे बदललेले दिसले. ती अनेकदा रात्रंदिवस ड्युटीच्या नावाखाली घराबाहेर राहायची.
मी जवळ गेलो असतो तर तिने शिवीगाळ केली असती, असा आरोप कन्हाई केला आहे. पत्नीनेही त्याच्यासोबत होळी साजरी केली नाही. हळूहळू, त्याला शंका येऊ लागली की आपल्या पत्नीला आता त्याच्याशी संबंध ठेवायचे नाहीत. यादरम्यान पत्नी आपल्या 10 वर्षांच्या मुलासोबत तिच्या माहेरच्या घरी गेली आणि शेवटचं बोलणं 14 एप्रिल 2023 रोजी झालं. पत्नीशी बोलू न शकल्याने तो सासरच्या घरी गेला. तिथे त्याला सासू-सासऱ्यांचा स्वभावही बदललेला दिसला. त्यामुळे त्याचा संशय अधिकच बळावला. त्याची पत्नी त्यांच्या 10 वर्षांच्या मुलासह बेपत्ता आहे. ती एका तरुणासह पळून गेल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.