Husband Wife Clash: नवरा बायकोचं भांडण हे अनेकांसाठी नवीन विषय नसतो. पण हे भांडण जेव्हा कोर्टात जातं तेव्हा कोर्ट यावर काय निकाल देतं याकडे साऱ्यांचेच लक्ष असतं. याच संदर्भात उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला. नवरा बायकोतील भांडणं काही नवी नाहीत, पण त्यात उच्च न्यायालयाने (High Court) दिलेला निकाल साऱ्यांचेच लक्ष वेधून घेणारा ठरला. 'नवऱ्याला घराबाहेर काढल्यानंतर जर घरात शांतता नांदत असेल, तर तसे आदेश द्यायला काहीच हरकत नाही', असं अतिशय रोखठोक मत उच्च न्यायालयाने नोंदवले. मद्रास उच्च न्यायालयात या संबंधीची याचिका करण्यात आली होती. त्यावर सुनावणी व निकाल देण्यात आला.
पतीकडे राहण्यासाठी दुसरे घर असेल किंवा नसेल तरीही त्याला घरातील शांततेच्या कारणास्तव घरातून बाहेर काढण्याचा आदेश बायकोला देण्यास कोर्टाची काहीच हरकत नसल्याचे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने दिले. बायकोने पर्याी व्यवस्थेची काळजी न करता थेट पतीला घराबाहेर काढले पाहिजे, अशा तीव्र शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने यावर निकाल दिला. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, एका हिंसाचार प्रकरणाच्या खटल्यावर मत नोंदवताना कोर्टाने ही टिप्पणी नोंदविली.
नक्की प्रकरण काय होतं?
मद्रास हायकोर्टात एक खटला सुरु होता. एका महिलेने जिल्हा न्यायालयात एक याचिका केली होती. त्यात, महिलेचा पती वारंवार तिचा अपमान करतो, म्हणून पतीला घर सोडण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी महिलेने केली होती. पण या महिलेची मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. पत्नीने मद्रास हायकोर्टात जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले. पतीची नेहमी असणारी नकारात्मक भूमिका आणि आपल्यासोबत असलेले गैरवर्तन यामुळे घरात नेहमी तणाव असतो, असा युक्तिवाद पीडित पत्नीच्या वतीने करण्यात आला. तर दुसरीकडे पतीने आपली बाजू मांडण्यासाठी युक्तिवाद केला. आदर्श माता फक्त मुलांचा सांभाळ करु शकते आणि घरची कामं करते, असे पतीचे मत होते. पण पतीचा हा युक्तिवाद कोर्टाने अमान्य केला आणि त्याच्या विचारसरणीवर ताशेरेही ओढले.