लखनौ - उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेच्या चारित्र्यावर तिच्या पतीने प्रश्नचिन् उपस्थित केले. या आरोपांमुळे धक्का बसलेल्या महिलेने आपण लाय डिटेक्टर टेस्टसाठी तयार असल्याचे सांगितले. तसेच पवित्रता सिद्ध करण्यासाठी या महिलेने कोर्टाकडे तशी परवानगी मागितली आहे.
या छळाला विरोध केल्याने या महिलेला तिच्या पतीने सहा वर्षांसाठी घरातून बाहेर काढले होते. त्यांचा घटस्फोट, हुंडा आणि छळाचा खलटा कोर्टामध्ये सुरू आहे. त्याचदरम्यान, पोटगी देण्यापासून वाचण्यासाठी पतीने कोर्टामध्ये महिलेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर पत्नीने आपली लाय डिटेक्टर आणि नार्को टेस्ट करावी, अशी विनंती कोर्टामध्ये केली. तसेच त्यासंदर्भात अर्ज दिला.
कानपूरच्या बर्रा येथे राहणाऱ्या महिलेचा विवाह १० फेब्रुवारी २०१५ रोजी झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगाही झाला होता. मात्र काही दिवसांनंतर पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर महिलेने पोटगीसाठी वेगळा अर्ज दाखल केला.
त्यानंतर पतीने पोटगीचा अर्ज फेटाळण्यासाठी कोर्टात पत्नीवर गंभीर आरोप केले. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर अप्पर कौटुंबिक न्यायालयात पत्नीने प्रार्थना पत्र देताना आपण अग्निपरीक्षा देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.
या महिलेने तिच्यावर लावलेल्या चारित्र्यहीनतेच्या आरोपांविरोधात लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचा अर्ज दिला आहे. कोर्टाला दिलेल्या अर्जामध्ये महिलेने सांगितले की, मी खोटं पकडणाऱ्या मशीनचा सामना करण्यासाठी तयार आहे. त्या मी माझ्या पतीशिवाय मी कुणासोबतही संबंध ठेवलेले नाहीत, हे सांगेन. दरम्यान, कोर्टाने या महिलेच्या अर्जावर सुनावणी करण्यासाठी ४ जून ही तारीख निश्चित केली आहे.