दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसविलं अन् ओढत ४३५ किमी मुलांसह 'त्यानं' केली पायपीट!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 02:03 PM2020-05-15T14:03:49+5:302020-05-15T14:12:09+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मध्य प्रदेशातील एका मजुराने आझमगडहून बिलासपूरपर्यंत जवळपास ४३५ किलोमीटरचा प्रवास आपल्या दोन मुलांसह दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसवून ती ओढत पायी केल्याचे समोर आले आहे.
कटनी - कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास अनेक राज्यांत अडकलेल्या मजुरांना सोसावा लागत आहे. अशा परिस्थिती अनेक मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशाच प्रकारे मध्य प्रदेशातील एका मजुराने आझमगडहून बिलासपूरपर्यंत जवळपास ४३५ किलोमीटरचा प्रवास आपल्या दोन मुलांसह दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसवून ती ओढत पायी केल्याचे समोर आले आहे. तसेच, या प्रवासादरम्यान मुलांच्या पायात चप्पल नव्हते, त्यामुळे अनवाणी चालून मुलांच्या पायाला जखमा झाल्या आहेत.
ज्यावेळी हे कुटुंब प्रवास करत असताना कटनी पोलिसांनी त्यांना पाहिले आणि त्यांची चौकशी केली. त्यावेळी आझमगडहून बिलासपूरला जाण्यासाठी आम्ही प्रवास करत असल्याचे या मुजराने सांगितले. या मजुराने आपले नाव राकेश कोटरे आणि पत्नीचे नाव रामेश्वरी कोटरे असल्याचे सांगितले. त्यानंतर कटनी पोलिसांनी त्याच्या दिव्यांग पत्नीला आणि मुलांना एका खासगी गाडीत बसविले आणि छत्तीसगडसाठी रवाना गेले.
(गर्भवती पत्नी, मुलीसाठी 'त्यानं' बनवली लाकडाची गाडी अन् ८०० किमी ओढत पायी चालला...)
लॉकडाऊनमुळे राकेश कोटरे याचे आझमगडमधील काम बंद झाले. त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबीयांसह आपल्या घरी बिलासपूर येथे जाण्यास भाग पडले. या प्रवासात राकेश कोटरेला पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये माणुसकी दाखविली आणि त्याच्या दिव्यांग पत्नीला आणि मुलाला बिलासपूरला पाठविण्यास मदत केली. पोलिसांनी कोटरे कुटुंबीयांना जेवण दिले. त्यानंतर राकेशच्या दिव्यांग पत्नीला आणि मुलांना मास्क दिले आणि एका गाडीतून त्यांना छत्तीसगडला रवाना केले.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत मजूर अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यातच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मजुरांना त्यांच्या घरी पाठवताना विशेष काळजी सरकारकडून घेण्यात येत आहे.