बोहना - पंजाबमधील एका नवऱ्याने आपल्या पत्नीला शिक्षणासाठी विदेशात पाठवले. विदेशात जाऊन राहणे, शिक्षण घेणे यासाठी नवऱ्याने जवळपास 25 लाख 70 हजार रुपये खर्च केले. पत्नी शिक्षणासाठी कॅनडामध्ये गेली. कॅनडात जाऊन शिक्षण घेतल्यानंतर तिथे नोकरी शोधून नवऱ्यालाही कॅनडात बोलविण्याच दोघांनी निश्चित केलं. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पत्नी कॅनडाहून पंजाबला परत आली आणि एका अन्य युवकाशी लग्न करुन त्याला घेऊन कॅनडाला परतली. त्यामुळे नवऱ्याने तिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची घटना घडली आहे.
या नवऱ्याचे म्हणणं आहे की, पत्नीने आपल्याला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं. या सगळ्या प्रकाराची कल्पनाही मला लागू दिली नाही. पाच वर्ष कॅनडात शिक्षण घेऊन त्याठिकाणी तिला नोकरी लागली. यानंतर ती लुधियाना परतल्यानंतर एका युवकाशी लग्न करुन कॅनडाला परत गेली. या प्रकरणात पोलिसांनी एनआरआय बायको आणि तिच्या नातेवाईकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे तसेच पत्नीच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पंजाबमधील संघा गावातील रहिवाशी जसप्रीत सिंह यांनी बोहना गावातील एका युवतीसोबत विवाह केला होता. या लग्नानंतर मुलीच्या पुढील शिक्षणासाठी तिला कॅनडाला पाठवण्याचा निर्णय सासरच्या मंडळींनी घेतला. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॅनडामध्ये नोकरी लागल्यावर जसप्रीत यालाही कॅनडात बोलवून घ्यावं असं निश्चित केलं.
जसप्रीत सिंह यांनी पोलिसात तक्रार दिलं आहे की, 1 मार्च 2011 रोजी आरोपी युवतीसोबत त्याचं लग्न झालं होतं. मोगा येथील विवाह नोंदणी कार्यालयात लग्नाची नोंदणीही करण्यात आली होती. लग्न होऊन सहा महिन्यानंतर सप्टेंबर 2011 मध्ये बायकोला कॅनडाला शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. लग्नाच्या या तीन वर्षाच्या कालावधीत पत्नीला विदेशात पाठवणे, तेथील शिक्षण, राहणे यासाठी 25 लाख 70 हजार खर्च झाले. या दरम्यान नोव्हेंबर 2015 मध्ये पत्नी कॅनडावरुन परतली आणि लुधियाना येथील युवकासोबत लग्न करुन पुन्हा कॅनडाला निघून गेली असा आरोप पतीने केला आहे.
हा घडलेला सगळा प्रकार जसप्रीतपासून लपविण्यात आला. जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा जसप्रीतच्या घरच्यांना धक्का बसला. जसप्रीतच्या घरच्यांनी पत्नीच्या आई-वडिलांकडे याची विचारणा केली त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अखेर पोलीस ठाण्यात हे प्रकरण पोहचलं आणि पोलिसांनी आरोपी पत्नीच्या घरच्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. पोलीस या घटनेचा अजून तपास करत आहेत.