सिमला : हिमाचल प्रदेशातील धर्मशालाचे भाजप आमदार विशाल नेहरिया यांनी आपला शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार त्यांच्याच पत्नीने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या पत्नी हिमाचल प्रदेश प्रशासनिक सेवेत (एचपीएएस) अधिकारी आहेत.
एचपीएएसच्या २०२०च्या बॅचच्या अधिकारी ओशिन शर्मा यांचा ११ मिनिटांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, भाजप आमदार पतीने मागील गुरुवारी आपल्याला तीन थप्पड लगावल्या. कांगडा जिल्हा ग्रामीण विकास एजन्सीच्या (डीआरडीए) नगरोट सूरियानमधील विभागीय विकास अधिकारी म्हणून शर्मा कार्यरत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, नेहरिया यांनी त्यांना अनेकदा शारीरिक व मानसिकरीत्या छळले आहे.नेहरिया व शर्मा यांचा विवाह अवघ्या दोन महिन्यांपूर्वी २६ एप्रिल रोजी झालेला आहे. त्या आता त्यांच्या माहेरी परतलेल्या आहेत. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये नेहरिया यांनी चंडीगडच्या एका हॉटेलमध्ये त्यांना मारहाण केली होती. ३२ वर्षीय नेहरिया २४ ऑक्टोबर, २०१९ रोजी पोटनिवडणुकीत धर्मशालाचे आमदार झाले आहेत. त्यांच्या पत्नीने म्हटले आहे की, मी कोरोना संक्रमित झाल्यामुळे विवाहानंतर चौथ्याच दिवशी पतीने बाहेर काढले. त्यानंतर, त्यांनी स्वत:ला जखम करून घेण्याची धमकीही दिली होती.
‘सासरकडील लोकांनी हुंड्यासाठीही छळ केला’ओशिन शर्मा या धर्मशालाचे भाजप आमदार विशाल नेहरिया यांना महाविद्यालयीन शिक्षणापासून ओळखत आहेत. त्यावेळीही नेहरिया त्यांना मारहाण करीत असल्यामुळे दोघांमधील संबंध संपुष्टात आले होते. नेहरिया यांनी आमदार झाल्यानंतर २०१९ मध्ये शर्मा यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर, दोघांचा विवाह झाला. आपल्या सासरकडील लोक हुंडा मागत आहेत, असा आरोपही शर्मा यांनी केला.