नवी दिल्ली - प्रेमात अनेकजण एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. पण फार कमी लोक ते शेवटपर्यंत निभावू शकतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. एका जोडप्याने तब्बल 80 वर्षे एकमेकांना साथ दिली आणि आता सोबतच शेवटचा श्वास घेतला असल्याची घटना घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर 5 तासांत पत्नीनेही जीव सोडला. त्यामुळे एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी देण्यात आला आहे. 105 वर्षांचा पती आणि 101 वर्षांची पत्नी ही जोडी प्रेमाचं एक अनोखं उदाहरण ठरली. लग्नानंतर हे जोडपं 80 वर्षे एकत्र राहिलं. अवघ्या पाच तासांच्या अंतराने दोघांचाही मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या अजमेर शहरातील श्रीनगर गावातील या जोडप्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भैरू सिंह रावत आणि त्यांची पत्नी हिरादेवी असं या जोडप्याचं नाव होतं. रावत यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचं 80 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांनाही एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा होता. हे जो़डपं त्यांचा 70 वर्षीय मुलगा शंकरसोबत राहत होते. तीन दिवसांपूर्वी दोघांनी एकत्रच जगाचा निरोप घेतला.
गावकऱ्यांनी या दोघांनीही आपलं जीवन अत्यंत साधेपणानं जगल्याचं सांगितलं. दोघंही एकत्र शेती करायचे. भैरू सिंह यांनी शेतीच्या कामानंतर गावातच किराणा मालाचं दुकान सुरू केलं. काही वर्षांपूर्वी भैरू सिंह यांना अर्धांगवायू झाला होता. भैरू सिंह यांचं दुपारी अचानक निधन झालं. पतीच्या निधनाचा धक्का पत्नी हिरादेवी यांना सहन न झालं नाही. पती भैरू सिंह यांच्या निधनानंतर अवघ्या पाच तासांत हिरादेवी यांनीही जगाचा निरोप घेतला.
एकाच दिवशी एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जाऊन दोघांनाही श्रद्धांजली वाहिली. मृत्यूनंतर दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर दोघांचे अंत्यसंस्कार पाहून स्मशानभूमीतील सर्वांचेच लोकांचे डोळे पाणावले. अंत्ययात्रेत आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.