हैदराबादच्या बेगमपेट डिव्हीजन येथील सहायक पोलीस आयुक्तांनी (ACP) सर्वांसमोर एका महिलेच्या कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बेगमपेटचे एसीपी एस. रंगाराव पत्रकार परिषदेत बी. मंगा उर्फ पद्मा या महिला आरोपीच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. एसीपी एस. रंगाराव यांच्याविरोधात पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित महिलेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. 'सोन्याच्या दुकानांमध्ये तीन महिला ग्राहक बनून जात होत्या. दुकानदाराचं लक्ष विचलीत करून सोन्यावर हात साफ करणं हे त्याचं काम होतं'. याबाबत पत्रकार परिषदेत एसीपी एस. रंगाराव माहिती देत असतानाच मागे उभ्या असलेल्या बी. मंगा उर्फ पद्मा या महिला आरोपीने मी कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नाही, पोलिसांनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवलं आहे, असं म्हटलं. मध्येच आरोपी महिला बोलल्यामुळे रंगाराव यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यानच कानाखाली लगावली. पुलिस उपायुक्त बी. सुमति यांनी पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार कानाशिलात लगावण्याच्या घटनेची चौकशी कऱण्याचे आदेश दिले आहेत, तसंच रंगाराव यांची बदली कऱण्यात आल्याचीही माहिती आहे.
पाहा व्हिडीओ -