हैदराबाद: एमआयएमचे नेते आणि हैदराबाद महानरपालिकेतील नगरसेवक घोसेऊद्दीन मोहम्मद यांनी पोलीस कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार घडला. त्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कामात अडथळा आणल्याचा, त्यांना धमकी दिल्याचा गुन्हा मोहम्मद यांच्याविरोधात नोंदवण्यात आला आहे.
कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी देत असतानाचा मोहम्मद यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात ते मुशीराबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना थेट धमकी देत असताना दिसत आहेत. रमझानच्या महिन्यात माझ्या विभागात येऊ नका, अशी दटावणी मोहम्मद यांनी केली. त्यांनी पोलिसांचा उल्लेख 'सौ रुपये का आदमी' असा केला.
'हे माझ्या परिसरात चालणार नाही. या विभागात महिनाभर यायचं नाही हे तुम्हाला सांगितलं होतं. मग तुम्ही इथे कशासाठी आलात? तुमचं काम करा आणि निघा. तुमच्या वरिष्ठ निरीक्षकांना फोन करा. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यांना सांगा नगरसेवक इथेच आहे,' अशी अरेरावीची भाषा एमआयएमच्या नेत्यानं केली.
रात्री उशिरा दुकानं सुरू असल्यानं दोन पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. दुकानं बंद करण्यास सांगत होते. तितक्यात नगरसेवक घोसेऊद्दीन मोहम्मद तिथे पोहोचले. त्यांनी पोलिसांचा अपमान केला. या प्रकरणी त्यांना बुधवारी अटक करण्यात आली.