कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता, ऑक्सिजन संचांचा तुटवडा, रुग्णांसाठी नातेवाईकांना बेड्स मिळवण्यासाठी करावी लागणारी धावपळ, उपचारातून रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्यासमोर हॉस्पिटलकडून दिलं जाणारं भरमसाठ रक्कमेचं बिल... या सर्व परिस्थितीच्या विळख्यात सामान्य माणून अडकला आहे. व्हायरसमुळे अजूनही लॉकडाऊनचे नियम कायम ठेवण्यात आले असल्यानं अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. त्यात कोरोना झालाच तरी भरमसाठ येणाऱ्या बिलामुळे अनेकजण उपचार घेण्यासही टाळाटाळ करत आहे. पण, अशात तेलंगणा येथील डॉक्टर व्हिक्टर इमॅन्युएल हे फक्त १० रुपणे फी घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांना मदत करत आहेत. ( Hyderabad: Doctor helps patients beat Covid-19 at home, with just Rs 10 fee)
भारतात मागील २४ तासांत १ लाख ५२,७३४ कोरोना रुग्ण आढळले, तर २ लाख ३८,०२२ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत ३१२८ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या एकूण २ कोटी ८० लाख ४७,५३४ इतकी झाली असून त्यापैकी २ कोटी ५६ लाख ९२, ३४२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख २९,१०० रुग्णांचे प्राण गेले आहेत. देशात सध्या २० लाख २६,०९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. २१ कोटी, ३१ लाख ५४,१२९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. मागील ५० दिवसांतील ही कोरोना रुग्णांची एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ९१.६०% इतका आहे.
बोदुप्पल येथे डॉक्टर इमॅन्यूएल यांचे प्रज्वल क्लिनिक आहे आणि ते general physician आहेत. त्यांच्या क्लिनिकबाहेर कोरोना रुग्णांची नेहमी गर्दी असते आणि फक्त १० रुपये फी घेऊन ते त्यांना मार्गदर्शन करत आहेत. ''गरजूंना मदत करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. लॉकडाऊनमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मी १० रुपये कन्सल्टंट फी घेतो. काहींना मोफतही उपचार देत आहोत. मागील वर्षांपासून आम्ही जवळपास २० ते २५ हजार कोरोना रुग्णांवर उपचार केले,''असे डॉक्टर इमॅन्युएल यांनी सांगितले.
केंद्रीय कर्मचारी पी जानकी राम यांच्या कुटुंबीयातील ७ जणांना कोरोना झाला होता आणि त्यांना उपचारासाठी फक्त १० हजार रुपये खर्च आला. डॉ. इमॅन्युएल यांच्या मार्गदर्शनाखाली हे सातही सदस्य घरी विलगिकरणात होते आणि त्यांनी दिलेल्या सल्लानं उपचार घेत होते. ''जर आम्ही कोणत्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो असतो तर बिल २५ लाखांच्या घरात झाले असते,''असे जानकी राम यांनी सांगितले.