हैदराबाद - हैदराबादमधील 'दिशा' रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना सकाळी घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात येत आहे. नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं जातंय. जनभावना पोलिसांच्या पाठिशी असल्याचं दिसून येतंय. विशेष म्हणजे 1 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एका ट्विटप्रमाणेच आजची घटना घडली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हे ट्विटही ट्रेंड करत आहे.
तेलंगणातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष आणि मंत्री केटी रामाराव यांनी 1 डिसेंबर रोजी हैदराबादेतील बलात्कार आणि खूनप्रकरणी ट्विट केले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेन्शन/टॅग करत त्यांनी मेसेज लिहिला होता. तसेच, दिशा रेड्डीच्या न्यायासाठी प्रार्थना केली होती. निर्भया प्रकरणातील आरोपींना 7 वर्षे झाली तरी फाशी देण्यात आली नाही. 9 वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्यानंतर सत्र न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली, पण हायकोर्टाने ती शिक्षा जन्मठेपेत बदलली. आता, हैदराबादमध्ये एका पशुवैद्यक महिलेचा क्रुरपणे खून करण्यात आलाय. असे म्हणत मोदींकडे हैदराबाद पीडितेच्या न्यायाची मागणी केली होती. संसदेत अधिवेशनावेळी हा विषय घ्यावा, पीडितांना लवकर न्याय मिळावा. न्यायाला उशिर होतोय, असं केटीआर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. केटीआर यांच्या ट्विटला रिट्विट करत एका अकाऊंट युजरने एक मार्ग सूचवला होता.