हैदराबादमधील 'दिशा' रेड्डी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना पहाटे घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. खासदार मनेका गांधी यांनीही जे घडलं ते भयानक आहे, अशा भावना व्यक्त केलं. तर, खासदार धैर्यशील माने यांनी हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलंय.
शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचं स्वागत आणि अभिनंदन केलंय. तसेच, या पोलिसांच्या कुटुबीयांना संरक्षण दिलं पाहिजे, त्यांनी जे केलंय ते योग्यच आहे. विशेष म्हणजे हैदराबाद पोलिसांना राष्ट्रपती पदक दिले पाहिजे, अशी मागणीही धैर्यशील मानेंनी केलीय. पोलिसांच्या कारवाईला विरोध करणाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत जर ही घटना घडली असती तर? पोलिसांच्या या कारवाईमुळे देशासमोर एक उदाहरण उभं राहील, अशी उदाहरण उभी राहणं गरजेची असल्याचंही मानेंनी म्हटलं. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही हैदराबाद पोलिसांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे म्हटलंय. उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण, येथील राज्य सरकार झोपलंय. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबादच्या पोलिसांची प्रेरणा घ्यायला हवी, असे मत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी व्यक्त केले आहे.
हैदराबादमधील दिशा बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपींचा तेलंगणा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर, देशभर या घटनेची चर्चा सुरू असून सर्वजण प्रतिक्रिया देत आहेत. मायावती यांनीही पोलिसांच्या या कृत्याचे समर्थन केले आहे. तसेच, उत्तर प्रदेश पोलिसांनी धडा घ्यावा. पण येथील गुन्हेगारांना पाहुण्यांप्रमाणे वागणूक दिली जातेय. येथे उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याचंही मायावती यांनी म्हटलंय.