हैदराबाद - 'दिशा' रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना सकाळी घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबात संशय व्यक्त केला आहे. मात्र, नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं जातंय. जनभावना पोलिसांच्या पाठिशी असल्याचं दिसून येतंय.
हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर कारवाईनंतर हैदराबादमध्ये महिला वर्गाकडून पोलिसांचे आभार मानले जात आहेत. पोलिसांनी जे केलं ते योग्यच, अशा भावना सोशल मीडियावरुन व्यक्त होत आहेत. तर, हैदराबाद पोलिसांना राखी बांधून, खांद्यावर उचलून आणि फटाके वाजवून हैदराबादमधील नागरिकांकडून समर्थन मिळत आहे. दिशा रेड्डीच्या पीडित कुटुंबीयांच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलांनी हैदराबाद पोलिसांचं चक्क राखी बांधून अभिनंदन आणि आभार मानलयं. तर, घटनास्थळावर गेलेल्या नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव केलाय. तसेच, फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केलाय.