Hyderabad Cyber Fraud: हैदराबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी चीनी हस्तकांचा समावेश असलेल्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्हेगारांनी एका वर्षाच्या आत किमान 15,000 भारतीयांची 700 कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केली आहे. हे पैसे दुबईमार्गे चीनला पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातील काही रक्कम लेबनॉनस्थित दहशतवादी गट हिजबुल्लाहच्या खात्यावरही पाठवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर क्राईम पोलिसांनी हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने म्हटले की, 'रेटिंग्स आणि रिव्ह्यू'साठी मेसेजिंग अॅपद्वारे त्याला पार्ट टाईम नोकरीची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर खरी असल्याचे मानत त्याने वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केले आणि फसवणुकीचा बळी ठरला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एकाचा संबंध काही चिनी नागरिकांशी आहे. तो भारतीय बँक खात्यांची माहिती सामायिक करुन त्यांच्याशी समन्वय साधतो आणि रिमोट ऍक्सेस अॅप्सद्वारे ही खाती दुबई-चीनमधून ऑपरेट करण्यासाठी OTP शेअर करतो.
हैदराबादचे पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांनी मीडियाला सांगितले की, या संदर्भात केंद्रीय एजन्सींना सतर्क केले असून, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर क्राईम युनिटलाही तपशील देण्यात आला आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि चकीत करणारे प्रकर आहे, कारण यात उच्च पगार असलेल्या सॉफ्टवेअर व्यावसायिकांनाही 82 लाख रुपयांचा चुना लावण्यात आलाय. पोलिसांना संशय आहे की, पैशाचा काही भाग क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केला गेला आणि हिजबुल्लाद्वारे चालवल्या जाणार्या वॉलेटमध्ये जमा केला.
या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. चार हैदराबाद, तीन मुंबई आणि दोन अहमदाबादमधून अटक झाली आहे. पोलीस अजून किमान सहा जणांचा शोध घेत आहेत. हैदराबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एप्रिलमध्ये एका व्यक्तीशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला. आपली 28 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पीडितेने सांगितले होते. गुंतवणुकीसह पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांना शेल कंपन्यांच्या नावाने 48 बँक खाती तयार झाल्याचे आढळून आले. या घोटाळ्यात एकूण 113 भारतीय बँक खाती वापरण्यात आली होती.