हैदराबादमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. डेंटिस्टने रुटीन चेकअपसाठी आलेल्या महिलेचा ओठ कापला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने तक्रार केल्यावर तो हसला आणि ती आता आणखी चांगली दिसत आहे असं म्हणत तिला टोमणा देखील मारला. ही संतापजनक घटना त्याच क्लिनिकमधील आहे जिथे एका 28 वर्षीय तरुणाला डेंटल सर्जरी दरम्यान आपला जीव गमवावा लागला. एनेस्थेशियाच्या ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाला.
ट्विटरवर सौम्या संगम नावाच्या एका महिलेने याबाबत ट्विट केलं आहे. आपल्या मैत्रिणीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये महिलेच्या ओठाचा काही भाग कापल्याचं पाहायला मिळत आहे. सौम्याने सांगितलं की, या गोष्टीला एक वर्षाहून अधिक काळ गेला आहे, परंतु माझ्या मैत्रिणीला अजूनही तोंड नीट उघडता येत नाही. ती मोकळेपणाने हसू येत नाही. परिस्थिती अशी आहे की ओठ नीट व्हावेत यासाठी ती आता स्टिरॉइड्स घेत आहे.
सौम्याने सांगितलं की, ही घटना ज्युबली हिल्स येथे असलेल्या त्याच एफएमएस हॉस्पिटलमध्ये घडली, जिथे काही दिवसांपूर्वी एनेस्थेसिया ओव्हरडोजमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. जेव्हा महिलेच्या आईने गुगलवर हॉस्पिटलबद्दल निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली तेव्हा डॉक्टरांनी आश्वासन दिलं होतं की त्यांच्या मुलीचे ओठ काही महिन्यांत बरे होतील. मात्र वर्षभरानंतरही डेंटिस्टच्या निष्काळजीपणाचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत.
मुलीच्या उपचाराबद्दल जेव्हा आई क्लिनिकमधील लोकांशी बोलली तेव्हा त्यांनी तिच्या वेदनांची चेष्टा केली आणि चांगली तर दिसत आहे असं म्हणत जोरजोरात हसू लागले. 16 फेब्रुवारी रोजी हैदराबादच्या लक्ष्मी नारायण विंजम याला 'स्माइल डिझायनिंग' शस्त्रक्रियेसाठी FMS इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र सर्जरीदरम्यान त्याची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.