हैदराबाद: डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याचं प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. आरोपींच्या कुटुंबीयांकडूनही हीच मागणी केली जात आहे. आमच्या मुलांना फाशीची शिक्षा दिली जात असल्यास त्याला आम्ही अजिबात विरोध करणार नाही, अशी भूमिका आरोपींच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. आरोपींनी ज्या निर्घृण पद्धतीनं पीडितेला जिवंत जाळलं, त्याचप्रमाणे आरोपींनादेखील जिवंत जाळण्यात यावं, अशी मागणी एका आरोपीच्या आईनं केली आहे. डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक आरोपी सी. केशवुलु हा नारायणपेट जिल्ह्यातल्या मकठल मंडलमधल्या गुंडीगांडला गावचा रहिवासी आहे. त्याची आई श्यामलानं तीव्र शब्दांत स्वत:च्या भावना व्यक्त केल्या. आरोपींना फाशी दिली जावी किंवा जाळून टाकण्यात यावं. त्यांनी डॉक्टरसोबत जे केलं, तेच त्यांच्याही बाबतीत केलं जावं', असं श्यामला म्हणाल्या. आपण महिला डॉक्टरच्या कुटुंबाच्या वेदना समजू शकतो. मला एक मुलगी आहे. त्यामुळे त्या महिलेच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढावलाय, त्याची कल्पना मी करू शकते. सगळ्या गोष्टींची जाणीव असतानाही माझ्या मुलानं अतिशय हीन कृत्य केलं. मी मुलाचा बचाव केल्यास सर्वजण आयुष्यभर माझा द्वेष करतील, असं श्यामला यांनी म्हटलं. गुरुवारी पोलिसांनी केशवुलुला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर पती घरी सोडून गेल्याचं त्यांनी सांगितलं. पाच महिन्यांपूर्वीच केशवुलुचा विवाह झाला होता. त्याला किडनीचा आजार असून त्याच्यावर ६ महिन्यांपासून उपचार सुरू असल्याची माहिती श्यामला यांनी दिली. हैदराबादमध्ये प्राण्यांच्या डॉक्टरवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरवर बलात्कार करण्यात आल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिला जाळण्यात आलं. या प्रकरणी आतापर्यंत सहाय्यक निरीक्षकासह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
Hyderabad Rape-Murder Case: त्यांनाही त्याच निर्घृणपणे जिवंत जाळा; आरोपीच्या आईची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 10:54 AM