हैदराबाद - शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर एका महिलेच्या पोटातच कात्री विसरल्याची घटना समोर आली आहे. हैदराबादमधील निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील हा संतापजनक प्रकार आहे. हर्नियाची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने 33 वर्षीय महिलेला उपचारांसाठी तिच्या कुटुंबीयांनी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महिलेच्या पोटाचा एक्स-रे काढल्यानंतर हैराण करणारी बाब उघडकीस आली. पोटात शस्त्रक्रियेची कात्री राहिल्याने तिला असह्य वेदना होत असल्याचे एक्स-रे रिपोर्टमधून स्पष्ट झाले. हर्नियाच्या ऑपरेशनदरम्यान या महिलेच्या पोटातच डॉक्टर शस्त्रक्रियेची कात्री विसरल्याची बाब तब्बल तीन महिन्यांनंतर समोर आली.
याप्रकरणी तिच्या पतीनं डॉक्टर आणि त्यांच्या टीमविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याव्यतिरिक्त हॉस्पिटल प्रशासनानंही चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे महिलेचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. ऑपरेशनच्या काही दिवसांनंतर तिला तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ लागला. एक्स-रे काढल्यानंतर तिच्या पोटात कात्री आढळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. तिच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलबाहेर निदर्शनं करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, महिलेला आता आणखी एका ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हा प्रकार दुर्दैवी - हॉस्पिटल प्रशासन ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया हॉस्पिटलचे संचालक के. मनोहर यांनी दिली आहे. दरम्यान, पोटात कात्री राहिल्यानं महिलेच्या आतील अवयवांना संसर्ग झालाय का?, याची तपासणीही डॉक्टरांचं एक पथक करत आहे. ऑपरेशननंतर 12 नोव्हेंबर 2018ला महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. पोट दुखू लागल्याने तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यादरम्यान, करण्यात आलेल्या वैद्यकिय तपासणीनंतर तिच्या पोटात कात्री असल्याचे निष्पन्न झाले. सध्या हॉस्पिटलमधील त्रिसदस्यीय समिती या घटनेची चौकशी करत आहेत