हैदराबाद - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा पोलिसांनी केला आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली.
तेलंगणा पोलिसांकडून या ४ आरोपींना घटनास्थळावर तपासासाठी नेलं होतं. त्यावेळी घटनेचा रिक्रिएशन समजून घेताना त्यातील आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी गोळीबार करत या आरोपींचा एन्काऊंटर केला आहे.
हैदराबाद बलात्कार प्रकरणाचे संपूर्ण पडसाद देशभरात उमटले होते. संसदेतही महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये ४ आरोपींचा खात्मा झाला आहे. मात्र आता या घटनेनंतर पोलिसांच्या चौकशीचा मुद्दा समोर येणार का? मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून संबंधित घटनेवर काय भाष्य होणार हे पाहणे गरजेचे आहे. परंतु संपूर्ण देशभरात या बलात्कार प्रकरणातील आरोपींबाबत संतापाची लाट होती. लोकांचा रोष, आक्रोश या आरोपींबद्दल होता. एखाद्या पीडितेसोबत बलात्कार करुन क्रूररित्या तिला जाळून टाकलं जातं. त्यामुळे लोकांकडून पोलिसांच्या कृत्याचं कौतुक केले जात आहे.
या घटनेतील आरोपींचे मृतदेह घटनास्थळावर पडून आहेत. मृतदेह काही वेळाने पोस्टमॉर्टमसाठी हलविण्यात येतील
पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितीची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडित स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कुटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले,तेव्हा पीडितीने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितीने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.
दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितीच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची ६ वाजता दुधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला होता.