हैदराबादमधील डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानं देशभरात खळबळ उडाली होती. क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या या घटनेतील चारही आरोपींना फाशी देण्याची तीव्र भावना अनेक मान्यवरांसह जनमानसांतून व्यक्त होत होती. अशातच, या चौघांनाही तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केल्याची बातमी आली. या 'सिंघम स्टाईल' कारवाईचं सोशल मीडियावरून भरभरून कौतुक होतंय. पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर, आपली मुलगी अशाच भीषण घटनेत गमावलेल्या, दिल्लीतील 'निर्भया'च्या आईनंही पोलिसांना सलाम केला आहे आणि आपल्या मुलीच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशी देण्याची विनंती केली आहे.
'गेली सात वर्षं माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून मी संघर्ष करतेय. न्यायालयात खेटे मारतेय. कोर्ट आरोपींच्या मानवाधिकाराचा मुद्दा पुढे करतंय. त्यामुळेच हैदराबादमध्ये जे झालं त्याने मी खूप खूश आहे. पोलिसांनी खूप चांगलं काम केलंय, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होता कामा नये. उलट त्यांनी एक उदाहरण घालून दिलं आहे. अशा कारवायांची आज गरज आहे, अशा शब्दांत 'निर्भया'ची आई आशा देवी यांनी एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांची पाठराखण करत आपल्या मनातील वेदनांनाही वाट मोकळी करून दिली आहे. जसा गुन्हा कराल, तशीच शिक्षा मिळेल, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. हैदराबादमधील घटनेतून सरकारने, दिल्ली पोलिसांनी आणि न्यायालयानेही योग्य धडा घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.
हैदराबादच्या 'दिशा' प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर म्हणजे देशासमोर एक उदाहरण ठेवण्यात आल्याचं पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे. तर, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली, अशा भावना 'दिशा'च्या वडिलांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, पोलिसांची ही कारवाई चुकीचा पायंडा पाडणारी आणि बेकायदेशीर असल्याचं मतही काही जणांनी मांडलंय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या एन्काउंटरच्या चौकशीची मागणी केली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही हे एन्काउंटर अयोग्य असल्याचं नमूद केलंय. 'झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. असा न्याय चंबळचे दरोडेखोरही करायचे. पण, शेवटी ते दरोडेखोरच होते', अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्याः
हैदराबादचे सिंघम ! बलात्कारातील आरोपींच्या एन्काऊंटरचं नेतृत्व करणारे IPS 'सज्जनार'
हैदराबाद प्रकरणः सरकारने एन्काऊंटरची फाईल बंद करावीः प्रणिती शिंदे
'दिल्ली अन् युपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी'