हैदराबाद - शहरातील डॉक्टर तरुणीसोबत बलात्कार आणि हत्या केलेल्या आरोपींचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पोलिसांकडून झालेला आरोपींचा एन्काऊंटर याची चौकशी करण्यासाठी तेलंगाना सरकारने विशेष तपास पथक(एसआयटी) स्थापन केलं आहे. या एसआयटीचे प्रमुख रचकोंडा येथील पोलीस आयुक्त महेश एम भागवत यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रविवारी हैदराबादच्या साइबराबाद पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर बनावटरित्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर तेलंगना केसीआर सरकारने तपासासाठी एसआयटी नेमली आहे. एसआयटीकडून या प्रकरणाशी जोडलेल्या सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. तसेच एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार आहे. या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगही सक्रीय झाला आहे. शनिवारी आयोगाची टीम हैदराबादला पोहचली. ज्याठिकाणी या आरोपींचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत त्याठिकाणी आयोगाच्या टीमने जाऊन पाहणी केली.
तेलंगना सरकारसोबतच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी केलेला एन्काऊंटर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेचा संविधानिक चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच तेलंगना हायकोर्टने शुक्रवारी राज्य सरकारला आदेश दिले आहेत की, या चारही आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबर रात्री ९ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवावे.
६ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना घडली. यामध्ये गुन्ह्यातील चारही आरोपींचा मृत्यू झाला. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही केली होती.
याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हैदराबादमध्ये ज्यांनी एन्काऊंटर केलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कायद्याची प्रक्रिया आहे ती ओलांडता येत नाही. झटपट न्याय देण्याची प्रथा पोलिसांनी सुरु केली आहे. त्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. आरोपीला अशाप्रकारे संपविता येत नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन महिना-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आलं असतं असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.