हैदराबाद: तेलंगणातून सडन कार्डियाक अरेस्टची(हृदयविकाराचा झटका) आणखी एक वेदनादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये 18 वर्षीय विद्यार्थ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला काही मिनिटात त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी अभियांत्रिकी कॉलेजच्या कॉरिडॉरमध्येच तो कोसळला. विशेष म्हणजे, तेलंगणात गेल्या 10 दिवसांच्या कालावधीत हृदयविकाराचा झटका येण्याची ही पाचवी घटना आहे. आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हैदराबाद जवळील CMR अभियांत्रिकी महाविद्यालयात सचिन बीटेक प्रथम वर्षात होता. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये तो मित्रांसोबत फिरत असताना सचिन अचानक जमिनीवर कोसळला. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन कोसळण्याआधी डळमळीत पावले टाकताना दिसत आहे. पडल्यानंतर त्याचे मित्र त्याला उचलण्यासाठी धावतात, पण तो उठत नाही. सचिन मूळचा राजस्थानचा रहिवासी होता. सचिनला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याला वाचवता आले नाही.
याआधीही असे मृत्यू झाले आहेतयाआधी मंगळवारी रात्री उशिरा हैदराबादच्या लालपेट भागातील प्रोफेसर जयशंकर इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन खेळताना 38 वर्षीय श्याम यादवचा मृत्यू झाला. त्यांना शासकीय गांधी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच, 27 फेब्रुवारी रोजी निर्मल जिल्ह्यातील पारडी गावात एका 19 वर्षीय तरुणाचा त्याच्या नातेवाईकाच्या लग्नात नाचताना मृत्यू झाला होता. याशिवाय, चार दिवसांपूर्वी हैदराबादमधील जिममध्ये व्यायाम करताना 24 वर्षीय पोलीस हवालदार जमिनीवर कोसळला होता. अशाप्रकारे गेल्या दहा दिवसात तेलंगणात पाच घटना घडल्या आहेत.