हैदराबादः नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच वर्षाला बढतीची अपेक्षा असते. चांगलं काम करूनही बढती न मिळाल्यानं बरेच जण दुखावले जातात आणि नैराश्येच्या गर्तेत अडकतात, पण हैदराबादमधल्या एका सरकारी कर्मचाऱ्यानं बढती न मिळाल्यानं थेट वरिष्ठ कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवला आहे. हैदराबादमधल्या सरकारी डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स केंद्रा (DNA Fingerprinting and Diagnostics Centre)त काम करणाऱ्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्यानं 55 वर्षांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यावर कार्यालय परिसरात कथित स्वरूपात चाकूहल्ला करत त्याला जखमी केलं आहे.हैदराबाद पोलिसांच्या मते, कनिष्ठ कर्मचाऱ्याला वरिष्ठ कर्मचाऱ्यानं नोकरीमध्ये बढती न दिल्यानं त्यानं त्याच्यावर हल्ला केला आहे. अकाऊंट विभागात काम करणाऱ्या एम. पी. शर्मा यांनी आपले वरिष्ठ अधिकारी के. व्ही. राव यांच्याबरोबर भांडण केलं. त्यानंतर त्यांनी कथित स्वरूपात वरिष्ठ कर्मचारी असलेल्या के. व्ही. राव यांच्यावर चाकूहल्ला चढवला. हल्ल्यात जखमी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तत्पूर्वी नवी दिल्लीतल्या नबी करीम भागात दोन तरुणांनी चाकूहल्ला केला होता, ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर दुसरा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
धक्कादायक! प्रमोशन न दिल्यानं कनिष्ठ कर्मचाऱ्याचा वरिष्ठ कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:19 PM