रशियाच्या वतीने युद्ध लढण्यासाठी कसा पोहोचला हैदराबादचा असफान?; मृत्यूने कुटुंबीयांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 10:22 AM2024-03-07T10:22:19+5:302024-03-07T10:32:31+5:30
असफानच्या मृत्यूची माहिती समजताच त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून त्यात दोन वर्षाचा मुलगा व आठ महिन्यांची मुलगी आहे.
तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील एका 30 वर्षीय तरुणाचा युक्रेनमध्ये रशियन सैन्यासाठी लढताना मृत्यू झाला. मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने बुधवारी हैदराबादच्या मोहम्मद असफानच्या मृत्यूची पुष्टी केली, परंतु त्याच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही.
भारतीय दूतावासाने ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला भारतीय नागरिक मोहम्मद असफानच्या दुःखद मृत्यूबद्दल कळलं आहे. आम्ही कुटुंब आणि रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. त्यांचं पार्थिव भारतात पाठवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
असफानच्या मृत्यूची माहिती समजताच त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून त्यात दोन वर्षाचा मुलगा व आठ महिन्यांची मुलगी आहे. त्याचा भाऊ मोहम्मद इमरानने सांगितलं की, तो सध्या काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही.
रेडिमेड कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्या असफानची दुबईतील नोकरी करणाऱ्या एजंटने फसवणूक केली. रशियन सैन्यात सहाय्यक म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तो आणि इतर दोघे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शारजाहमार्गे मॉस्कोला गेले होते. सुरुवातीला त्यांना दरमहा 30,000 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर दीड लाख रुपये मिळतील, असेही एजंटने त्याला सांगितले होते.
असफानशी संपर्क होऊ न शकल्याने असफानच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी हैदराबाद पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि नंतर असदुद्दीन ओवेसी यांच्याशी संपर्क साधला. AIMIM अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. रशियन सैन्याच्या वतीने युक्रेनमध्ये लढण्यास भाग पाडलेल्या 12 भारतीयांना परत आणण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन जयशंकर यांना केलं. इमारतींच्या सुरक्षेचे काम करण्यासाठी रशियात गेलेल्या या बेरोजगार तरुणांची फसवणूक करून त्यांना युद्धासाठी नेण्यात आल्याचं सांगितलं.
यामध्ये तेलंगणातील दोन, कर्नाटकातील तीन, काश्मीरमधील दोन आणि गुजरात आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एका तरुणाचा समावेश आहे. 21 फेब्रुवारी रोजी रशिया-युक्रेन सीमेवर डोनेस्तक भागात हवाई हल्ल्यात गुजरातमधील 23 वर्षीय हामिल मंगुकिया याचा मृत्यू झाला होता. युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी तीन एजंटनी बेरोजगार तरुणांना रशियात पाठवून फसवणूक केल्याचे ओवेसी म्हणाले आहेत.