हैदराबाद - तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केला आहे. त्यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त वी.सी. सज्जनार यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात हैदराबादपोलिसांनी हा एन्काऊंटर केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासावेळी आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून हे आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबारी केली. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात सज्जनार यांनी तपास यंत्रणांमध्येही गतीमान कामगिरी केली आहे. यापूर्वीही एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस हवालदारांना निलंबित केले आहे. सज्जनार हे 1996 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तसेच, स्पेशल इंटेलिजन्स ब्रँचच्या आयजीपदी आणि त्याच ब्रँचच्या डेप्युटी आयजी पदही त्यांनी कामकाज केलं आहे. साबराबदच्या कमिशनरपदी नियुक्ती झाल्यानंतरही पत्रकारांशी बोलताना, मुलं आणि महिलांची सुरक्षा हेच आपलं प्राधान्य असल्याचं सज्जनार यांनी म्हटलं होतं. जनगाव येथून अतिरिक्त पोलीस अधिक्षक म्हणून सज्जनार यांनी आपल्या आपीएस करिअरची सुरुवात केली आहे. हैदराबाद पोलिसांच्या एन्काऊंटरनंतर सोशल मीडियातून तेलंगणा पोलीस आणि सायबराबादचे पोलीस आयुक्त सज्जनार यांचं कौतुक होत आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी 'दिशा' बलात्कार प्रकरणाता तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. तसेच, दोषींना कडक शिक्षा ठोठावण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार असल्याचेही राव यांनी सांगितले होते. मात्र, हैदराबाद पोलिसांच्या या एन्काऊंटरमुळे 8 दिवसांतच याप्रकरणाचा निकाल लागला आहे.
हैदरबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली होती. पीडितीच्या हत्याप्रकरणी पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला होता. प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितीवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितीला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितीवर अत्याचार करण्यात आले. दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना दिशाने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितीच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची 6 वाजता दुधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला होता.