तेलंगणातील हैदराबादमध्ये ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या केल्याच्या प्रकरणानं संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांना आरोपीचा तातडीनं शोध घेऊन त्याला कठोर शासन करण्याची मागणी लावून धरली आहे. यातच तेलंगणा सरकारमधील मंत्र्यानंही नराधमाला पकडून त्याचा थेट एन्काऊंटर करुन टाकू असं विधान केलं आहे.
तेलंगणा सरकारचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी हैदरबाद बलात्कार प्रकरणावर संताप व्यक्त केला. पीडित कुटुंबाला न्याय मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. इतकंच नव्हे, तर या प्रकरणातील नराधमाला अटक करुन त्याचा एन्काऊंटर करुन टाकू, असंही रेड्डी म्हणाले आहेत. लवकरच पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कुटुंबीयांना आवश्यक अशी सर्व मदत सरकारकडून केली जाईल असं सांगतानाच आरोपीला सोडणार नाही. त्याचा एन्काऊंटर करुन टाकू असं रोखठोक मत रेड्डी यांनी व्यक्त केलं आहे.
हैदराबादमधील या धक्कादायक प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहेत. नागरिकांमध्ये रोष वाढत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच खासदार रेवाथ रेड्डी यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. हैदराबादसह संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी या प्रकरणावरुन निदर्शनं केली जात आहेत. काही ठिकाणी मेणबत्त्या घेऊन मोर्चे देखील काढले गेले आहेत. चिमुकल्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी नागरिकांना लावून धरली आहे.
९ सप्टेंबर रोजी घडली घटना, आरोपीवर १० लाखांचं इनामएका ६ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं धक्कादायक प्रकरण ९ सप्टेंबर रोजी घडलं होतं. मुलीचा मृतदेह एका बंद घरात सापडला होता. पोलीस या प्रकरणात एका ३० वर्षीय व्यक्तीचा शोध घेत आहेत. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांकडून एकूण १५ पथकं नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात देखील आरोपीचा शोध घेतला जात आहे. हैदराबाद पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यावर १० लाखांचा बक्षीस देखील जाहीर केलं आहे. या प्रकरणामुळे तेलंगणातील राजकीय वातावरण देखील तापलेलं असल्यानं पोलिसांवर आरोपीचा शोध घेण्यासाठी दिवसेंदिवस दबाव वाढत आहे.