ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १८ - हैदराबाद विद्यापीठातून निलंबित करण्यात आलेल्या दलित विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणात केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गच्चीबावली पोलिस स्थानकात बंडारु दत्तात्रय यांच्या विरोधात एससी आणि एसटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार मंत्री असणारे दत्तात्रय बंडारु यांच्यावर विद्यार्थ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच आरोप करण्यात आला आहे.
हैदराबाद युनिव्हर्सिटीतून निलंबित करण्यात आलेल्या पाच दलित विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. रोहित (वय २५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यासह पाच जणांना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात युनिव्हर्सिटीतून निलंबित करण्यात आले होते. रोहितच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी अतिशय संतप्त झाले असून युनिव्हर्सिटी प्रशासनाविरोधात त्यांच्यात अत्यंत रोषाचे वातावरण असून सुमारे २०० विद्यार्थी युनिव्हर्सिटीत निदर्शने करत आहेत.
गुंटूर येथील रहिवासी असलेला रोहित गेल्या दोन वर्षांपासून युनिव्हर्सिटीत सायन्स टेक्नॉलॉजी अॅण्ड सोसायटी स्टडीज या विषयात पीएचडी करत होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोन विद्यार्थ्यांच्या गटांत झालेल्या बाचाबाचीमध्ये रोहितचाही समावेश होता. या प्रकरणी युनिव्हर्सिटी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले होते आणि त्यानंतर रोहितसह आणखी चार जणांना निलंबित करण्यात आले होते. या पाचही जणांना युनिव्हर्सिटीची इमारत, हॉस्टेल्स, लायब्ररी, खानावळ आणि इतर परिसरात प्रवेश करण्यास बंदी होती. यामुळे रोहित व चार जणांच्या समर्थनार्थ इतर व्दियार्थ्यांनी रविवारी युनिव्हर्सिटीच्या आवारात उपोषण करत त्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती. अखेर रविवारी रात्री रोहितने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले आणि गळफास लावून स्वत:चे जीवन संपवले.