पैगंबर मुहम्मदांवरील वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार टी राजा सिंह यांना तेलंगणा पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. अटकेपूर्वी टी राजा यांनी एक व्हिडिओ जारी केला. तेलंगणा पोलीस हे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची कठपुतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर आपण कुणालाही घाबरणार नाही, आपण मरायलाही तयार आहोत, असेही टी राजा यांनी म्हटले आहे.
टी राजा यांच्या विरोधात निदर्शने -तेलंगणा पोलिसांनी भाजपचे निलंबित नेते टी राजा सिंह यांना, पैगंबर मुहम्मदांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली हैदराबाद येथील त्यांच्या घरातून अटक केली आहे. टी राजा यांच्या विरोधात 23 ऑगस्टला हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती.
न्यायालयाने दिला होता जामीन -तत्पूर्वी, या प्रकरणात न्यायालयाने आमदार टी. राजा सिंह यांना इशारा देत जामीन दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने त्यांना सर्वप्रथम 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला होता. मात्र नंतर, न्यायालयाने रिमांडचा आदेश मागे घेत त्यांना जामीन दिला. पोलिसांनी टी. राजा सिंह यांना हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयात हजर केले होते.
याशिवाय, भाजपने टी. राजा यांना भाजपमधून निलंबितही केले आहे. एवढेच नाही, तर पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत 10 दिवसांत उत्तर द्यायलाही सांगितले आहे. पैगंबर मोहम्मदांवरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी त्यांना मंगळवारीही अटक केली होती. टी. राजा सिंह हे हैदराबादमधील गोशामहल मतदार संघाचे आमदा आहेत.