हैदराबाद - पोलीस म्हणजेही शेवटी माणूसचं की, त्यात बहिण आली, बाप आला अन् आईसुद्धा. हैदराबादच्या बेगमपेठ पोलीस ठाण्यात अशीच एका खाकी वर्दीतल्या महिलापोलिसातली आई जागली, रडणाऱ्या तान्हुलीला पाहून या आईला मायेचा पाझर फुटला. खाकी वर्दीतल्या या आईच्या मायेनं एका अनाथ लेकराला दूध पाजलं. महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका यांनी भुकेने व्याकूळ झालेल्या 2 महिन्यांच्या चिमुकलीला स्तनपान केले. त्यानंतर, खाकी वर्दीतल्या मातोश्रीचं सोशल मीडियासह सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
हैदराबादमधील एका महिला पोलिसाने आपल्या मातृत्वाने अन् दातृत्वाने सर्वांचीच मने जिंकली. बेगमपेठ येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल प्रियंका सध्या बाळंतपणाच्या रजेवर आहेत. मात्र, पतीच्या एका फोन कॉलवर प्रियंका यांनी पोलीस ठाण्यात येऊन खाकी वर्दीमागील मातृत्वाचं दर्शन दिलं. येथील उस्मानिया रुग्णालयाजवळ एका महिलेनं बाहेर उभा असलेल्या पुरुषाच्या हातात आपले 2 महिन्यांच बाळ दिल. मी या बाळासाठी पाणी घेऊन येते असे सांगून ती महिला निघून गेली. बराच वेळा झाला तरी संबंधित महिला न आल्यामुळे त्या व्यक्तीने चिमकुल्या बाळासह अफजलगंज पोलीस ठाणे गाठले. अफजलगंज येथे नेमणुकीस असलेले प्रियंकाचे पती के.रविंदर ती चिमुकली भुकेनं व्याकूळ असल्याचं जाणलं. तसेच या बाळाला आईच्या दुधाची गरज असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे, रविंदर यांनी फोन करुन प्रसुती रजेवर असलेल्या पत्नी प्रियंकाला पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. त्यावेळी भुकेने व्याकूळ झालेल्या व रडत असलेल्या लहान अनाथ मुलीला पाहून के. प्रियंका यांनीही तिला जवळ घेत आपले दूध पाजले. त्यानंतर, रुग्णालयातही नेले. दरम्यान, महिला पोलीस प्रियंका यांच्या या दातृत्वाचे आणि खाकी वर्दीतल्या मातृत्वाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, महिला पोलीस के प्रियांका यांनी जी संवेदनशीलता दाखवली त्यासाठी हैद्राबाद पोलीस आयुक्तांनीही के.प्रियंका व तिचे पोलीस पती एम. रवींदर यांना सन्मानित केले.