लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचार सभांना वेग आला आहे. दरम्यान, हैदराबादमधीलभाजपाच्या उमेदवार के. माधवी लता सध्या प्रचारात व्यस्त आहेत. या प्रचारदम्यान, के. माधवी लता यांची गळाभेट घेणाऱ्या महिला सहायक उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अलीकडेच के. माधवी लता एका निवडणूक रॅलीदरम्यान सैदाबादला पोहोचल्या होत्या. यादरम्यान, उमा देवी या महिला सहायक उपनिरीक्षक कर्तव्यावर त्यांनी के. माधवी लता यांना हस्तांदोलन करत गळाभेट घेतली होती.
यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर हा व्हिडिओ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. यानंतर शहर पोलीस आयुक्त के. श्रीनिवास रेड्डी यांनी उमा देवा यांच्यावर कारवाई केली. त्यांना ड्युटीवरून निलंबित केले आहे. शहर पोलीस आयुक्त के श्रीनिवास रेड्डी यांनी सोमवारी महिला सहायक उपनिरीक्षक उमा देवा यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनंतर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी उमा देवा यांना निलंबित करण्यात आले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान के. माधवी लता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. नुकताच सोशल मीडियावर के. माधवी लता यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता, ज्यामध्ये त्या रामनवमीच्या मिरवणुकीत मशिदीकडे बाण दाखवताना दिसत होत्या. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर के. माधवी लता यांनी आपले स्पष्टीकरण मांडले आणि माफीही मागितली.
तेलंगणातील 17 जागांसाठी 13 मे रोजी मतदानलोकसभा निवडणुकीत सध्या हैदराबादची जागा चर्चेत आहे. हैदराबाद मतदारसंघातून भाजपाकडून के. माधवी लता निवडणूक लढवत आहेत. तर के. माधवी लता यांच्याविरोधात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादमधून चार वेळा खासदार झाले आहेत. तसेच, हैदराबाद हा एआयएमआयएमचा बालेकिल्ला मानला जातो. तेलंगणातील लोकसभेच्या सर्व 17 जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.