हैदराबाद: एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर अलीकडेच उत्तर प्रदेशमधील मेरठहून दिल्लीकडे जात असताना गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. यानंतर एमआयएमचा गड मानल्या जाणाऱ्या हैदराबाद येथे असदुद्दीन ओवेसी यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. मात्र, यावेळी १०१ बकऱ्यांचा बळी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर केंद्राकडून ओवेसी यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ओवेसी यांनी केंद्राने देऊ केलेली झेड दर्जाची सुरक्षा नाकारली होती. सदुद्दीन ओवेसी यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने १०१ बकऱ्यांचा बळी दिला. बकऱ्यांच्या बळी देण्यासाठी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
अनेक धक्कादायक खुलासे
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मलाकपेटचे आमदार आणि एआयएमआयएम नेते अहमद बलाला यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ओवेसी यांच्यावरील हल्ल्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या हल्ल्यानंतर दोन आरोपींना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले असले, तरी यानंतरही या हल्ल्यात आणखी अनेक जण सहभागी असल्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, ही संपूर्ण घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दिसत होते. एकाने लाल हुडी घातली होती आणि एकाने पांढरा शर्ट आणि पॅन्ट घातली होती. ओवेसींच्या ताफ्याच्या वाहनाने धडक दिल्याने लाल रंगाचा हुडी घातलेला हल्लेखोरही जखमी झाला होता.