बीजिंग : चीनने तिबेटमध्ये उभारलेला प्रचंड मोठा झॅम जलविद्युत प्रकल्प मंगळवारी सुरू केला. ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेल्या धरणावर हा प्रकल्प असून त्यामुळे भारतात या नदीच्या येणाऱ्या पाण्याला अडथळा येऊ शकतो अशी काळजी व्यक्त होत आहे. या प्रकल्पाच्या सर्व सहा युनिटस्ना एकत्र करून त्यांचे रूपांतर पॉवर ग्रीडमध्ये करण्यात आले आहे. ग्यासा प्रांतातील या जलविद्युत प्रकल्पाला ब्रह्मपुत्रा नदीचे भरपूर पाणी उपलब्ध झाले आहे. तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रेचे नाव यार्लुंग झँगबो असे असून ती तिबेटमधून भारतात व नंतर बांगलादेशात जाते. १.५ अब्ज अमेरिकन डॉलरचा हा प्रकल्प जगातील सर्वाधिक उंचीवरील जलविद्युत प्रकल्प असल्याचे समजते. त्यातून वर्षाला २.५ अब्ज किलोवॅट-आवर्स वीज निर्माण होईल. ब्रह्मपुत्रेवरील भारताच्या आंतरमंत्रालयीन तज्ज्ञ गटाने २०१३ मध्ये ब्रह्मपुत्रेच्या वरच्या भागात बांधल्या गेलेल्या धरणांमुळे खालच्या भागात पाणी पोहोचण्यावर काय परिणाम होईल यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले होते.
ब्रह्मपुत्रेवर जलविद्युत प्रकल्प सुरू
By admin | Published: October 14, 2015 1:03 AM