नवी दिल्ली : रेल्वेविषयी देशातील लोकांच्या मनात एक वेगळेच स्थान आहे. प्रवासाची इतर प्रगत साधने कितीही उपलब्ध झाली, तरी रेल्वे प्रवासाविषयी लोकांचे मत वेगळे आहे. भारतीय रेल्वेने देशभरात आपले जाळे पसरवले असून गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या आधुनिकतेवर जास्त भर दिला जात आहे. दरम्यान, आता रेल्वे भारतात हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन्स बनवत असून त्या 2023 पर्यंत तयार होतील. यासंदर्भातील माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली. ओडिशातील भुवनेश्वर येथील SOA विद्यापीठातील एका कार्यक्रमात अश्विनी वैष्णव उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वे गतिशक्ती टर्मिनल धोरणांतर्गत रेल्वे नेटवर्कद्वारे दुर्गम भागात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. हे काम वेगाने सुरू आहे. याचबरोबर, भारतात हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन्स स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आल्या असून गेल्या दोन वर्षांपासून या ट्रेन्स कोणताही मोठा दोष नसताना धावत आहेत. अशा आणखी वंदे भारत ट्रेन्स आयसीएफमध्ये बनवल्या जात असून त्या लवकरच सेवेत आणल्या जातील, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
अलीकडेच वंदे भारत ट्रेनला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तर आतापर्यंत केवळ जर्मनीने हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन्स तयार केल्या आहेत. या वर्षी जर्मनीने हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनची पहिली खेप सुरू केली आहे. फ्रेंच कंपनी आल्सटॉमने 92 मिलियन डॉलर खर्च करून 14 ट्रेन्स तयार केल्या आहेत.
दरम्यान, यापूर्वी रेल्वे आणि ट्रॅक व्यवस्थापनाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, "आमचे लक्ष केवळ ट्रेन बनवण्यावर नाही. आम्ही ट्रॅक मॅनेजमेंट सिस्टमवर देखील काम करत आहोत जेणेकरून सेमी हायस्पीड ट्रेन्स चालवता येतील. वंदे भारत ट्रेन्सच्या ट्रायल रनमध्ये आम्ही दाखवले की, 180 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्रेनमध्ये पाण्याने भरलेला ग्लास ठेवला होता आणि तो अजिबात हलला नाही, पण यामुळे जगाला आश्चर्यचकित केले."
72 वंदे भारत ट्रेन्सचे उत्पादन सुरूवंदे भारतच्या यशस्वी चाचणीनंतर उर्वरित 72 ट्रेन्सचे उत्पादन सुरू होईल, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ते म्हणाले, "तिसर्या वंदे भारत ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर असेल. हा 52 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडेल. तर बुलेट ट्रेन हा वेग 55 सेकंदात पकडते. पहिल्या टप्प्यातील वंदे भारत ट्रेन्स 54.6 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकतात आणि 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकतात. सध्या दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. एक नवी दिल्ली ते वाराणसी आणि दुसरी नवी दिल्ली ते वैष्णोदेवीपर्यंत धावते."