डिझेल इंजिनची जागा विजेवर चालणाऱ्या इंजिननी घेतली आहे. आता या इलेक्ट्रीक इंजिनची जागा हायड्रोजनवर चालणाऱ्या इंजिनाने घेतली तर नवल वाटायला नको. कारण देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी सुरु झाली आहे. पर्यावरणाला अनुकुल असलेली ही ट्रेन जिंद ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे.
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे त्याची निर्मिती करण्यात आली आहे. जिंद ते सोनीपत हा ८९ किमीचा मार्ग आहे. ही ट्रेन ११० किमी प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. तसेच एकाच वेळी ही ट्रेन २६३८ प्रवाशांना नेऊ शकते. या ट्रेनची ताकद १२०० एचपी एवढी आहे.
अशाप्रकारच्या ३५ ट्रेन बनविण्यात येणार आहेत. ज्या देशातील विविध भागात सुरु केल्या जाणार आहेत. ८ कोच असलेली ही ट्रेन जगातील सर्वात जास्त लांबीची हायड्रोजन ट्रेन असणार आहे. जगातील फक्त चार देशांमध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन आहेत. या ट्रेन ५०० ते ६०० एचपी ताकद निर्माण करतात. भारताच्या ट्रेनची ताकद याच्या दुप्पट असून आपण जगातील पाचवा देश ठरणार आहोत.
कशी ऊर्जा मिळते...हायड्रोजन ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन सेल असतो, जो हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अभिक्रियेतून वीज निर्माण करतो. या प्रक्रियेत पाणी (H₂O) आणि ऊर्जा निर्माण होते. यामुळे ही ट्रेन पर्यावरणासाठी अतिशय स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठरते.
केंद्राची किती तयारी...यंदाच्या अर्थसंकल्पात हायड्रोजन ट्रेनच्या निर्मितीसाठी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पायाभूत सेवांसाठी ६०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.